कल्याण पश्चिम विभागात ३९ वीजचोरांवर कारवाई

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) महावितरणच्या कल्याण पश्चिम विभागात वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई सुरू आहे. एप्रिल महिन्यात ३९ जणांकडून सुरू असलेल्या १२ लाख २२ हजार ९०० रुपयांच्या ९ लाख ९० हजार युनिट वीजचोरीचा पर्दाफाश करण्यात महावितरणच्या पथकांना यश आले आहे.


          कल्याण पश्चिम विभागातील रेतीबंदर, चिराग हॉटेल, मोहल्ला, अग्रवाल कॉलेज रोड, उंबर्डे गॅस गोडाउन, बारावेगाव, जोशीबाग, मुरारबाग, मोहने, अटाळी, आरएस टेकडी, वल्लीपीर रोड, स्टेशन रोड, चिखलेबाग, हिराबाग, आंबेडकर रोड, मकबरा आदी भागात वीजचोरी शोध मोहिम राबवून ३९ वीज चोरांविरुद्ध कारवाई करण्यात आली. वीज मीटरशी छेडछाड, मीटर टाळून (बायपास) वीजवापर, मीटरकडे येणाऱ्या केबलला जाईट आदी प्रकार वापरून या वीजचोऱ्या होत असल्याचे आढळून आले. 


         वीजचोरीचे देयक व दंडाची रक्कम न भरणाऱ्यांविरुद्ध महात्मा फुले पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अभियंता दिगंबर राठोड यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. वीजचोरीच्या गुन्ह्यात ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विजेचा चोरटा वापर टाळण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments