नुतनीकृत टाऊन हॉल तसेच विभागीय प्रदर्शनाच्या कामांची जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केली पाहणी


ठाणे, दि. ३० (जिमाका) – ठाण्याचे सांस्कृतिक वैभव असणाऱ्या टाऊन हॉलचे नुतनीकरण करण्यात आले असून उद्या महाराष्ट्र दिनी या नुतनिकृत टाऊन हॉलचे आणि विभागस्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून त्याच्या कामाची पाहणी आज जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी  केली.  


नुतनीकरण केलेल्या टाऊन हॉलचे उद्घाटन उद्या, १ मे रोजी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. त्याचवेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने आयोजित कोकण विभागस्तरीय विकास कामांच्या प्रदर्शनाचे उद्घाटनही होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांच्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी आज कार्यक्रमस्थळी जाऊन घेतला. यावेळी निवासी जिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन), गोपीनाथ ठोंबरे, तहसीलदार राजाराम तवटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता रणजित शिंगाडे आदी उपस्थित होते. 


पुरातन वास्तू असलेल्या टाऊन हॉलचे पूर्वीचे वैभव जपून ठेवत त्याचे नुतनीकरण करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन त्याच्या वैभवाला साजेसे व्हावे, यासाठी त्यांनी काही सूचना केल्या. राज्य शासनाच्या गेल्या दोन वर्षातील विकास कामांची माहिती जनतेला व्हावी, यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोंकण विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने भरविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांची माहिती देणाऱ्या सचित्र प्रदर्शनाच्या कामाची माहितीही श्री. नार्वेकर  यांनी घेतली. 


दरम्यान, कोंकण विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे यांनीही सायंकाळी प्रदर्शनस्थळाची पाहणी केली. प्रदर्शनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या विकास कामांची माहिती जनतेला व्हावी, यासाठी हे प्रदर्शन उत्कृष्ट होण्यासाठी त्यांनी यावेळी सूचना केल्या. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी प्रदर्शनास उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

Post a Comment

0 Comments