सन २०२२ - २३ या आर्थिक वर्षातील कर वसुलीचे सुयोग्य नियोजन करा थक बाकीदारांवर कारवाई करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे कडक निर्देश

■महापालिका आढावा बैठकीत बोलताना अतिरिक्त महापालिका आयुक्त संजय हेरवाडे सोबत उप आयुक्त  जी. जी. गोदेपुरे.   

ठाणे : सन २०२१-२२ हे आर्थिक वर्ष संपले असले तरी सन २०२२-२३ आर्थिक वर्षातील कर वसुलीचे सुयोग्य नियोजन करून जास्तीत जास्त कर वसुली करण्यासोबतच थकबाकीदारांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी आज सर्व कर निरीक्षकांना दिले. 


        आज कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत बोलताना श्री. हेरवाडे यांनी सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील वसुली तसेच सन २०२२-२३ आर्थिक वर्षातील वसुलीचे नियोजन या संदर्भात आज सविस्तर आढावा घेतला. यावेळी मालमत्ता कर आणि पाणी पट्टी कर वसुलीकडे दुर्लक्ष न करता जास्तीत जास्त कर वसुली करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्याचे कडक निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी दिले.


        सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात ३१ मार्च अखेर ६१३.९२ कोटी मालमत्ता कराच्या स्वरूपात वसुली झाली आहे. सदरची वसुली ही निर्धारित इष्टांकाच्या ८३ टक्केपेक्षा जास्त झाली आहे. जवळपास ५,४३,५२० मालमत्ता कराची देयके वितरित करण्यात आली होती. यावेळी वसुलीसाठी प्रामाणिक प्रयत्न करून जास्तीत जास्त वसूली करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक करत कमी वसुली केलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी सक्त ताकीद दिली.   

  

         त्याचप्रमाणे प्रत्येक प्रभाग समिती निहाय वेळेत बिले छपाईसाठी देवून २६ तारखेपर्यत ९० टक्के बिलांचे वितरण करून वसुली करावी. तसेच शहरातील एकही थकबाकीदार शिल्लक न ठेवता १५ मे पर्यत त्यांच्यावर धडक कारवाई करण्याचे निर्देशही श्री. हेरवाडे यांनी यावेळी दिले. यासोबतच ज्यांचे धनादेश क्लीअर झालेल्या नाहीत त्यांना एप्रिल पर्यत मुदत देवून ते क्लीअर करावेत. अन्यथा मे महिन्यात संबंधित थकबाकीदारावर गुन्हे दाखल करण्याचे कडक निर्देशही त्यांनी दिले.

       

     दरम्यान अस्तित्वातील मालमत्तांची वसुली करण्याबरोबरच नवीन मालमत्तांची कर आकारणी करून तसे प्रमाणपत्र संबंधित कर निरीक्षकांनी एप्रिल महिन्याअखेर सादर करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. त्याचबरोबर हौसिंग सोसायट्यांना स्वतंत्र देयके वितरित करणे, ५०० चौ. फूट क्षेत्रफळ असणाऱ्या मालमत्ताच्या नोंदी तात्काळ पूर्ण करणे, तुटलेल्या मालमत्ताची मागणी डिमांडमधून कमी करणे तसेच वापरात बदल किंवा अनिवासी भाडेतत्वावरील कर आकारणीची कार्यवाहीही करण्याच्या सूचना श्री. हेरवाडे यांनी दिल्या.

Post a Comment

0 Comments