म्हाडा सोसायट्यांच्या लीज रेंट व एनए कराचा प्रश्न राष्ट्रवादीमुळे मार्गी

 

शिवसेनेने लोकांच्या वरातीत फुकटचे नाचू नये- आनंद परांजपे , बारटक्केंनी आयत्या बिळावर नागोबा होऊ नये- अमीत सरैय्या...


ठाणे (प्रतिनिधी) - ठाण्यातील पाचपाखाडी, सावरकर नगर येथील म्हाडाच्या सोसायट्यांच्या लीज रेंट आणि एन ए कराचा प्रश्न मार्गी लावत या करांवरील व्याज आणि दंड माफ करुन या सोसायट्यांमध्ये राहणार्‍या नागरिकांना दिलासा मिळवून देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आपण संघर्ष केला आहे. मात्र, येथील नागरिकांचे लीज रेंट आणि अकृषीकर कराचा (एनए) प्रश्न आपण मार्गी लावल्यानंतर आता शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के हे फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. 


नागरिकांना दिलासा देण्यासाठी अमीत सरैय्या आणि मयूर शिंदे यांनी प्रचंड पाठपुरावा  केला होता. मात्र, दुर्देवाने ‘नाच ना जाने अंगण तेढा’ या प्रमाणे  राष्ट्रवादीचे काम, श्रेय राष्ट्रवादीचे मात्र लोकांच्या वरातीत फुकटचे नाचायचे असे उद्योग दिलीप बारटक्के यांच्याकडून केले जात आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली.


पाचपाखाडी, सावरकर नगर भागामध्ये म्हाडाच्या 110 सोसायट्या आहेत. या सोसायट्यांच्या जमिनीची मालकी अद्यापही म्हाडाकडे आहे. तसेच, स्थानिक नागरिक एनए कर भरण्यास तयार आहेत. मात्र, त्यावर तसेच लीज रेंटवर व्याज आकारण्यात येत असल्याने नागरिकांना ही रक्कम भरणे त्रासदायक ठरत होते. 


ही बाब स्थानिक नागरिकांनी अमीत सरैय्या यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सरैय्या यांनी गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे पाठपुरावा करुन हा प्रश्न निकाली लावला आहे. मात्र, याचे श्रेय सेनेचे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के हे घेत असल्याने स्थानिक नागरिकांसोबत परांजपे आणि अमीत सरैय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन या मागील वस्तूस्थिती उघडकीस आणली.  यावेळी मयूर शिंदेही उपस्थित होते. 


परांजपे म्हणाले की, सावरकर नगर, वसंत विहार, पाचपाखाडी, पवार नगर विविध ठिकाणी म्हाडाच्या कॉलनी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून म्हाडाच्या लीज रेंट आणि एन ए टॅक्सवरील यावरील व्याज व दंड याचा मोठा प्रश्न अल्प उत्पन्न धारकांना भेसावत होता. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अमीत सरैय्या यांनी गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांना 6 ऑक्टोबर 2021 रोजी एक पत्र दिले. त्यानुसार 1 एप्रिल 1998 ते 31 मार्च 2022 पर्यंतचा लीज रेंट आणि एनए करावरील व्याज माफ करावे, अशी मागणी केली.


 त्यानुसार गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी 12 ऑक्टोबर 2021 रोजी म्हाडाच्या सर्व उच्चपदस्थ अधिकार्‍यांसह अमीत सरैय्या यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक घेतली. त्यानंतर 8 मार्च 2022 रोजी म्हाडा प्राधिकरणाने  1 एप्रिल 1998 ते 31 मार्च 2022 पर्यंतचा लीज रेंट आणि एनए करावरील व्याज संपूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला. याबद्दल आम्ही ठाणेकरांच्या वतीने डॉ. आव्हाड यांचे आभार मानतो. या  नागरिकांना दिलासा देण्यासाठी अमीत सरैय्या आणि मयूर शिंदे यांनी प्रचंड पाठपुरावा  केला होता.


मात्र, दुर्देवाने ‘नाच ना जाने अंगण तेढा’ या प्रमाणे  राष्ट्रवादीचे काम, श्रेय राष्ट्रवादीचे मात्र लोकांच्या वरातीत फुकटचे नाचायचे असे उद्योग केले जात आहे. येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांचे कोणतेही श्रेय नसताना हँडबिल वाटून ते श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा निर्णय होण्याचे संपूर्ण श्रेय हे अमीत सरैय्या आणि मयूर शिंदे यांचे आणि स्थानिक नागरिकांचेच आहे. डॉ. आव्हाड, सरैय्या आणि शिंदे यांच्यामुळेच म्हाडामधील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे, असे आनंद परांजपे यांनी सांगितले. 


दरम्यान,  अमीत सरैय्या यांनी सांगितले की, म्हाडाच्या 110 सोसायट्यांच्या जमिनीची मालकी म्हाडाकडेच आहे. शिवाय, येथील नागरिकांना एनए कर भरावयाचा असूनही त्यावर आकारण्यात आलेल्या दंडात्मक व्याजामुळे नागरिकांनी कोंडी झाली होती. हा प्रश्न सोडविण्यासाठी आपण गेले 3 वर्षे प्रयत्न करीत होतो. त्यासाठी स्थानिक नागरिकांच्या वतीने आपण 6 ऑक्टोबर 2021 रोजी गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. म्हाडा हे खाते डॉ. आव्हाड यांच्याकडे असल्याने त्यांच्याकडे पाठपुरावा करुन 12 ऑक्टोबर रोजी बैठक लावली. 


या बैठकीचे इतिवृत्त आणि व्हीडीओ फुटेजही आहे. त्याउपरही नागरिकांच्या समस्या आणि मते जाणून घेण्यासाठी याच विषयावर आर. जे. ठाकूर विद्यालयामध्ये 22 जानेवारी 2022 रोजी एक बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये नागरिकांनी अमीत सरैय्या यांचे आभार मानले होते. या बैठकीला ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे आणि माणिक पाटील हेदेखील उपस्थित होते. डॉ. आव्हाड यांच्या आदेशानुसार येथील नागरिकांचा अकृषीकर कर, लीज रेंटचा प्रश्न मार्गी लागला आहे.

 

ना. आव्हाड यांनीच लीज रेंट आणि एन ए करावरील व्याज-दंड माफ केला आहे. आता केवळ नागरिकांना मुद्दल अदा करावे लागणारे आहे.  सावरकरनगरसाठी केलेल्या पाठपुराव्याचा लाभ सबंध ठाणे शहरातील म्हाडा वसाहतींना झाला आहे. त्यातून म्हाडाचे सुमारे 35 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गोरगरीबांना फायदा व्हावा, या उद्देशाने ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी हा निर्णय घेतला असतानाही शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी पत्रके वाटून श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आयत्या बिळावर नागोबा बनण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. 


त्यांना आम्ही खुले आव्हान देतो की, म्हाडाच्या 110 सोसायटयांचा प्रश्न कोणी मार्गी लावला; त्यासाठी कितीवेळा बारटक्के म्हाडा कार्यालयात गेलात? किती अधिकार्‍यांशी बारटक्के बोलले? ही प्रक्रिया कशी होती? कितीवेळा नागरिकांच्या बैठका घेतल्या? याचे पुरावे दिलीप बारटक्के यांनी सादर केले तर आपण राजकारण सोडू. मात्र,  असे पुरावे सादर करता आले नाही तर बारटक्के यांनी जाहीर माफीनाम्याचेही पोस्टर्स लावावेत, असे आव्हानही अमीत सरैय्या यांनी दिले आहे. 


■नरेश म्हस्के हे जिल्हाप्रमुख झाल्यापासून सेनेची संस्कृती बदलली


या पूर्वी असे दुसर्‍याचे श्रेय लाटण्याची संस्कृती शिवसेनेमध्ये नव्हती. मात्र, नरेश म्हस्के हे जिल्हाप्रमुख झाल्यापासून शिवसेनेमध्ये दुसर्‍याचे श्रेय घेण्याची संस्कृती वाढीस लागली आहे. काम दुसर्‍याचे आणि बॅनर स्वत:चा लावायचा, असे प्रकार ते करीत आहेत.  कलियुगातील नारद आहेत ना ते!, असा टोला आनंद परांजपे यांनी लगावला.

Post a Comment

0 Comments