महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा बैल-घोड्यांसह सायकल मोर्चाठाणे (प्रतिनिधी) - देशात सद्या महागाईचा आगडोंब उसळला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी तसेच वाढलेले इंधनाचे दर कमी करावेत, या मागणीसाठी गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशाने व शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनानुसार कळवा-मुंब्रा युवाध्यक्ष अश्रफ शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली सायकल मोर्चा काढण्यात आला. या सायकल मोर्चामध्ये बैलगाडी, घोडेस्वारही सहभागी झाले होते. हा मोर्चा ठाण्यातील भाजप कार्यालयावर नेण्यात येणार होता. मात्र, तत्पूर्वी मोर्चेकर्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 
देशात दिवसेंदिवस इंधनाचे दर गगनाला भिडू लागले आहेत. त्यामुळे महागाईचा आगडोंब उसळला आहे. निवडणुका संपल्या की मोदी सरकारकडून इंधनाचे दर वाढविले जात असल्याचा आरोप करीत शानू पठाण यांनी हा मोर्चा काढला होता. हे सर्व मोर्चेकरी ठाण्यातील खोपट परिसरात असलेल्या भाजपच्या कार्यालयात येऊन भाजपच्या शहराध्यक्षांना निवेदन देऊन ते निवेदन थेट पंतप्रधानांना द्यावे, अशी सूचना करणार होते. मात्र, अमृतनगर येथून निघालेल्या या मोर्चाला आनंद कोळीवाडा येथे अडविण्यात आले. या सर्व मोर्चेकर्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.दरम्यान, यावेळी शानू पठाण यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. “ एकीकडे हे भाजपचे नेते इंधन दरवाढीला महाविकास आघाडीला जबाबदार धरत आहेत. तर, भाजप शासीत राज्यात इंधन 50 रुपयांनी मिळते का?” असा सवाल करीत, आम्हाला मोदींचे अच्छे दिन नकोा; आम्हाला आमचे जुने दिवसच हवे आहेत, असे शानू पठाण यांनी यावेळी म्हटले.

Post a Comment

0 Comments