धनुर्विद्या खेळाचे प्रशिक्षण देउन नववर्षाची सुरुवात


कल्याण : विनायक मार्शल आर्ट्स आणि फिटनेस झोन यांच्या वतीने हिंदु नववर्ष आणि गुढीपाडव्याचे औचित्य साधून रविंद्र विद्यालय टिटवाळा येथे एक ऑलिंपिक खेळ तसेच पारंपारिक युद्ध कला म्हणुन प्रचलित असलेल्या धनुर्विद्या (आर्चरी) या खेळाचे अत्याधुनिक शस्त्राच्या माध्यमातून क्रीडा प्रशिक्षण देण्यात आले. टिटवाळा येथे प्रथमच सुरु झालेल्या आर्चरी या अत्याधुनिक क्रीडा प्रकारामुळे लवकरच या क्रीडा प्रशिक्षणाच्या माध्यमातून टिटवाळा येथील ग्रामीण भागातून ओलंपिक दर्जाचे खेळाडू निर्माण होतील अशी सर्वांना आशा आहे.


          नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी या शिबिरासाठी विविध वयोगटातील ३० सहभागिनी उपस्थिती दर्शविली होती. राज्य युवा पुरस्कार विजेते आणि क्रीडा प्रशिक्षक विनायक कोळी यांच्याहस्ते आर्चरी या खेळाच्या पहिल्या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. क्रीडा प्रशिक्षक हरीष वायदंडे यांनी सर्व सहभागी युवक व युवतींना आर्चरी च्या अत्याधुनिक क्रीडा प्रकाराचे नियम आणि क्रीडा साहित्यांच्या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले. 


           विनायक कोळी यांनी आर्चरी या खेळासाठी सराव करण्यासाठी अत्यावश्यक असणारी लहान लहान तंत्रे यांचे प्रशिक्षण दिले व सर्व सहभागी कडून ते करवून देखील घेतले. सराव झाल्यानंतर सर्व सहभागी युवक व युवतींना आर्चरी या खेळाचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले व त्यांच्याकडून प्रात्यक्षिक करवून घेण्यात आले.


        या उपक्रमासाठी क्रीडा प्रशिक्षक संतोष मुंढे, गणेश गायकवाडसमाधान कोंडावळे तसेच प्रविण साबळे सहाय्यक प्रशीक्षक म्हणुन उपस्थित होते. त्यांनी हा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. अनेक सहभागी युवक व युवतींचे पालक देखील या उपक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी देखिल या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. गुढीपाडव्यानिमित्त सुरु झालेले हे क्रीडा प्रशिक्षण असेच पुढे देखील चालू राहणार आहे. 


          तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी सदर खेळाचे प्रशिक्षण घेउन आर्चरी या क्रीडा प्रकारात नैपुण्य प्राप्त करावे आणि राज्यराष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन स्वतःचे तसेच टिटवाळा शहराचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन विनायक कोळी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments