ओबीसींना सत्तेपासून वंचित ठेवण्याचा डाव - अ‍ॅड प्रकाश आंबेडकर

फुले स्मारकासाठी 25 लाखांचा निधी देणार- आ. निरंजन डावखरे

■ओबीसींनी जात म्हणून नव्हे तर संघटना म्हणून एक व्हावे- हरीभाऊ राठोड 


ठाणे :(प्रतिनिधी) -  आम्ही ओबीसीच्या पाठीशी आहोत म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेणार नाही अशी घोषणा केली जाते. मात्र दुसरीकडे जिथे आरक्षणच नाही अशा विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका घेतल्या जाणार, सत्तेपासून ओबीसीना वंचित ठेवण्याचा हा डाव असून ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेत संधी आहे त्याच निवडणूका घेतल्या जात नाहीत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. यावेळी, आ. निरंजन डावखरे यांनी फुलेस्मारकासाठी 25 लाखांचा निधी देण्याची घोषणा केली. 


ठाणे ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने प्रमुख निमंत्रक प्रफुल वाघुले यांच्यावतीने गडकरी रंगायतनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर बोलत होते. यावेळी मंचावरआ. विद्या चव्हाण, ओबीसी नेते मा.खा. हरीभाऊ राठोड, सपा नेते एस.बी यादव,  बन्सी डोके, सुरेश पाटील आदी उपस्थित होते. 


आंबेडकर म्हणाले की,  ओबीसीना आरक्षण देण्यास या सरकारची मानसिकता नसून आरक्षण मिळवण्यासाठी सत्ता काबीज करणे महत्वाचे आहे. त्यामुळे आरक्षणाचा लढा सुप्रीम कोर्टात योग्यरीत्या मांडण्यासाठी तसेच आपल्या न्याय हक्कासाठी राजकीय पक्ष स्थापन केल्याशिवाय पर्याय नाही.   ओबीसीना सामाजिक ओळख मिळावी हा आमचा देखील प्रयत्न होता. तोच प्रयत्न या एकीकरण समितीच्या माध्यमातून होत असल्याबाबद्दल त्यांनी एकीकरण समितीचेही कौतुक यावेळी केले. 


आंबेडकर पुढे म्हणाले, आज जात जातनिहाय जनगणना झाली तर कितीतरी जाती अस्तत्वात नसल्याचे समोर येईल. अशा प्रकारची जनगणना झाली तरी स्वातंत्र्यनंतरही जो समाज सुरक्षित नाही,तो उठाव करून उठेल म्हणूनच ही जनगणना केली जात नाही,त्यामुळे जोपर्यंत जनगणना होणार नाही तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही असा आरोप त्यांनी यावेळी केला.   सत्ता कोणाचीही असो मात्र प्रामाणिकता पूर्णपणे संपली आहे. 12 पर्यंत आरक्षणाची गरज भासत नाही मात्र खरी आरक्षणाची गरज नंतर पडते. 


गेल्या 70 वर्षांच्या कालावधीत एज्युकेशन ऑफ चॉईस अशी परिस्थिती निर्माण करता आलेली नाही अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.  एखाद्या समाजाला दुर्लक्षित करणे ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे ओबीसीना स्वतःचे राजकीय अस्तित्व निर्माण करावे लागेल. आरक्षण मागून मिळणार नाही तर ते खेचून आणावे लागेल असे सांगत यासाठी ओबीसी समाजाला राजकीय पक्ष काढावाच लागेल असे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.आ. निरंजन डावखरे यांनी ओबीसी समाजाच्या एकत्रिकरणाच्या या प्रयत्नाचे कौतूक केले. त्याचवेळी ठाणे महानगर पालिकेने मंजुरी दिलेल्या स्मारकासाठी आमदार निधीतून 25 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी केली. 


हरिभाऊ राठोड यांनी, जातीचे मोर्चे हजारोंच्या घरात निघतात. मात्र, ओबीसी म्हणून आपण एकत्र येत नाही. त्याचाच फटका आपणाला बसत आहे. आता आपण ओबीसी म्हणून एकत्र येण्याची गरज आहे, असे सांगितले. तर,  विविध समाजातील घटकांना एकत्र आणण्यासाठी सर्वच स्तरातून पाठबळ मिळाले असल्याचे कार्यक्रमाचे निमंत्रक प्रफुल वाघुले यांनी यावेळी सांगितले.  तर, प्रास्ताविकामध्ये ज्येष्ठ पत्रकार मधुकर मुळूक यांनी ओबीसी एकीकरणामागील भूमिका विषद केली.


दरम्यान,  या जयंती उत्सवात शेकडो ओबीसी बांधवांनी उपस्थिती दर्शविली होती. हा जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी  मंगेश आवळे, मेघनाथ घरत,  संजय भालेराव, राहुल पिंगळे, सुरेश पाटीलखेडे, निलेश मंडलिक, पप्पू मोमीन, गजानन चौधरी, सुभाष देवरे, सचिन शिंदे,  पप्पू आठवाल, राजेंद्र देसाई, सचिन  केदारी, स्वप्नील वाघोले, जितेंद्र यादव, रामाश्रय यादव, रामानंद यादव,  रामहित यादव, शिवप्रसाद यादव, प्रशांत हडकर, नितीन पाटील, संतोष मोरे, महेश ताजणे, कृष्णा भुजबळ, रामप्रकाश निषाद, गणेश कुरकुंडे,  सचिन देशमाने, यतीन पवार, अमित पाटील, अमीत गुजर, निलेश हातणकर, हेमंत राऊत, आदींनी प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments