कल्याण : संघटनात्मक काम करत असतांना कार्यकर्ता एकनिष्ठ असावा असे मत एल. आर. पाटील यांनी व्यक्त केले. माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कोकण विभागाचे माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते शालेय शिक्षण क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा जन्म रामनवमीला झाल्यामुळे राम नवमीला जयंती साजरी केली जाते. या वर्षी स्व.मोते सर विचार मंच ने ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या सहकार्याने व कल्याण तालुका डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाने शिक्षक-शिक्षकेतंरांकरिता शिक्षक भवन येथे वैद्यकीय तपासणी आयोजित केली होती.
कार्यक्रमाप्रसंगी रामनाथ मोते यांचे स्नेही एल.आर. पाटील व शिक्षक आघाडीचे पदाधिकारी विकास पाटील, खान्देश मंडळाचे सचिव रवी पाटील, एम्स हॉस्पिटलच्या डॉ. विनिता भोईर, राकेश उपाध्याय प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.
यावेळी एल. आर. पाटील म्हणाले कि, मोते सरांनी आपले पूर्ण आयुष्य शिक्षकांसाठी घालवले. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष न देता सतत शिक्षण आणि शिक्षकांकरिता काम करत होते. शिक्षकांच्या आता अनेक संघटना निर्माण झाल्या आहेत. कार्यकर्ता हा एकनिष्ठ असायला हवा. स्वतःचा स्वार्थ न पाहता समाजोपयोगी काम करणारा असावा. असेही म्हणाले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता गुलाबराव पाटील, जगदीश पाटील, गजानन भोसले, आप्पाराव कदम, संजय वाघ, सुभाष सरोदे गणेश पालांडे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुलाबराव पाटील यांनी केले तर सूत्र संचालन गणेश पाटील व राहुल खंदारे यांनी एम्स हॉस्पिटल ने पाठविलेल्या तपासणी पथकाचे विशेष आभार व्यक्त केले.
0 Comments