भिवंडी मनपा कर्मचाऱ्यांच्या वतीने मा.महापौर, मा. आयुक्त, मा.स्थायी समिती सभापती, सभागृह नेते यांचा सत्कार!

भिवंडी दि 11 (प्रतिनिधी ) सध्या देशात उष्णतेच्या लाटेबरोबरच महागाईची मोठी लाट आलेली आहे. या लाटेत गरीब आणि मध्यमवर्गीय जनता होरपळून निघाली आहे. प्रत्येक कुटुंबाचे मासिक बजेट कोसळले आहे. आर्थिक चणचणीमुळे समाजात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाचे आर्थिक स्तर उंचावणे ही काळाची गरज बनली आहे. 


आणि अशातच भिवंडी महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग नुकताच लागू होऊन त्याप्रमाणे वाढीव वेतन मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वतीने कामगार कर्मचारी संघर्ष कृती समितीच्या पुढाकाराने महापौर  प्रतिभाताई विलास पाटील, आयुक्त डाॅ.सुधाकर देशमुख , स्थायी समिती सभापती संजय (भाइ) म्हात्रे , सभागृह नेते सुमित पाटील तसेच अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे , उपायुक्त दीपक पुजारी  आणि दीपक झिंजाट  यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम पालिका मुख्यालयात पार पडला. 


               ७ वा वेतन आयोग लागू करण्यासाठी महापौर प्रतिभाताई पाटील  यांच्या सूचनेनुसार महासभेत ठराव घेण्यात आला. त्यावेळी सर्वच सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका यांनी साथ देऊन ठराव संमत केला. त्यानंतर मत्रालय पातळीवर अनेक अडचणी आल्या. त्या अडचणीवर मात करताना कामगार कर्मचारी संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी संपूर्ण पाठपुरावा करत होते. त्यावेळी मा.आयुक्तांनी प्रत्येक त्रुटी तात्काळ दूर व्हावी म्हणून सहकार्य केले. सकारात्मक दृष्टीकोन ठेवला. आणि ७ वा वेतन आयोग लागू करण्याकरिता शासनाकडून मंजुरी मिळविली. 


           त्यानंतर आस्थापना विभागाला हाताशी धरुन एकच महिन्यात सर्व कर्मचाऱ्यांची वेतन निश्चितीचे काम पूर्ण केले. मार्च पेड एप्रिलचे वेतन ७ व्या वेतन आयोगानुसारच मिळावे म्हणून मा.आयुक्त, कृती समितीची पदाधिकारी आणि आस्थापना विभाग यांनी विडाच उचलला होता. आणि सगळ्यांच्याच मेहनतीचे फलित म्हणून एप्रिल महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगानुसारच मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी खुश होऊन कामगार कर्मचारी संघर्ष कृती समितीच्या पुढाकाराने पालिका मुख्यालयात उपरोक्त  मा.मान्यवरांचा आज सत्कार केला. 


               सदर कार्यक्रमात कामगार कर्मचारी संघर्ष कृती समितीने ७ वा वेतन आयोगाचा फरक देणेबाबत आणि एकुण ३५% महागाई भत्ता फरक देण्याची विनंती केली. याबाबत सभागृह नेते सुमित पाटील यांनी महासभेत विषय घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी कृती समितीचे पदाधिकारी घनःश्याम गायकवाड, महेंद्र कुंभारे, भानुदास भसाळे, राजेश जाधव, गौतम शेलार, दीपक राव, राजू चव्हाण, श्रीपत तांबे, भगवान साळवी, भगवान जाधव, सुरेंद्र खिसमतराव,  विजय भोईर आणि मोठ्या प्रमाणात भिवंडी मनपाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments