भिवंडीतील शिरोळे आश्रम शाळेतील 17 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा ; एका विद्यार्थिनीचा मृत्यू ,3 विद्यार्थी रुग्णालयात


भिवंडी : दि.04 (प्रतिनिधी )   भिवंडी तालुक्यातील शिरोळे येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आश्रम शाळेतील 17 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली असून एका नऊ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असल्याची घटना समोर आली आहे. ज्योत्स्ना जयवंत सांबर या नऊ वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.तर उर्वरित सोळा विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून त्यापैकी तीन जणांवर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे उपचार सुरु असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

          भिवंडी तालुक्यातील दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या शिरोळे गावातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आश्रम शाळेतील पाच विद्यार्थ्यांना 28 मार्च रोजी अन्नातून विषबाधा झाली होती. या विद्यार्थ्यांना सुरुवातीला दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी ज्योत्स्ना हिची प्रकुर्ती चिंताजनक असल्याने पुढील उपचारा साठी आयजीएम उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.परंतु आश्रमशाळा व्यवस्थापकाने विद्यार्थिनीस उपचारा नंतर आश्रमशाळेत नेऊन ठेवले व दि.29 मार्च रोजी सकाळी 5 वाजता पुन्हा प्रकुर्ती बिघडल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता त्यावेळी ती मृत झाली असल्याचे निष्पन्न झाले .त्यानंतर उर्वरित आजारी असलेल्या चार विद्यार्थ्यांना आयजीएम व तेथून पुढे ठाणे कळवा रुग्णालयात हलविले . त्यानंतर 28 मार्च ते 2 दोन एप्रिल या सहा दिवसात तब्बल 17 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची लक्षणे आढळल्याने या विद्यार्थ्यांवर कळवा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे .तर तिघा जणां वर उपचार सुरू आहेत.


          विशेष म्हणजे २८ मार्च रोजी काही विद्यार्थ्यांनी जेवणानंतर काकडी व त्यानंतर प्लास्टिक पिशवीत मिळणारी बर्फाची पेप्सी कांडी खाल्ल्या नंतर पाच विद्यार्थ्यांना उलटी व जुलाब व इतर लक्षणे जाणवू लागली होती.यापैकी एका नऊ वर्षाच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्या नंतर जिल्हा आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून या घटनेनंतर ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या बालरोग तज्ञांचे पथक आश्रम शाळेत दाखल होत त्यांनी सदर घटनेची माहिती घेतली असून सर्व विद्यार्थ्यांची तपासणी व उपचार केले. 


त्याचबरोबर शहापूर येथील प्रयोगशाळेत येथील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते मात्र सदरचे पाणी पिण्या योग्य असल्याचे प्रयोगशाळेतील अहवालात स्पष्ट झाले आहे.अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी देखील आश्रम शाळेत धाव घेत विद्यार्थ्यांनी खाल्लेली पेप्सी व अन्नधान्याचे नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठविले आहेत. मात्र त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याची माहिती भिवंडी तालुका आरोग्य अधिकारी माधव वाघमारे यांनी दिली आहे. या घटनेची नोंद पडघा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.


          वेळीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल न केल्याने विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने यास सर्वस्वी जबाबदार आश्रमशाळा व्यवस्थापकां विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी स्थानिकां कडून केली जात आहे .या बाबत शहापूर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी रंजना किल्लेदार यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ न शकल्याने त्यांची नेमकी भूमिका समजू शकली नाही.

Post a Comment

0 Comments