डोंबिवलीत शिवसेनेच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी


डोंबिवली  ( शंकर जाधव ) डोंबिवली शिवसेना शहर शाखेच्यावतीने शिवजयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. डोंबिवली पूर्वेतील शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या बाहेर शिवकालीन चलचित्र देखावा लक्षवेधी होता. सकाळी श्री सत्यनारायण महापूजा तर संध्याकाळी पूर्व-पश्चिम विभागातील  मिरवणूक शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ एकत्रित झाल्या. 


             डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अपूर्ण करून त्यांना अभिवादन केले. यावेळी पदाधिकारी संतोष चव्हाण, किरण मोंडकर, ममता घाडीगांवकर, सुधीर पाटील, सतीश मोडक, सीमा अय्यर, संध्या शिर्के आदी उपस्थित होते. मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे सण-उत्सवापासून  नागरिकांना वंचित राहावे लागले होते. आता कोरोनापासून मोकळीक मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये शिवजयंतीचा जल्लोष होता. पूर्व-पश्चिम तसेच ग्रामीण भागात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 


           शिवसेना युवा पदाधिकारी राहुल म्हात्रे यांनी पश्चिमकडील नवापाडा येथे जयंतीचा भव्य देखावा साकारला होता. विविध प्रकारच्या बॅनरच्या माध्यमातून जयंती देखाव्याने लक्ष वेधून घेतले. जुनी-डोंबिवली व ठाकुरवाडी प्रभागातील माजी नगरसेविका संगीता पाटील आणि समाजसेवक मुकेश पाटील यांनी श्री सत्यनारायण महापूजा तसेच विभागात तोरणे आणि झेंडे लावून पूर्ण विभाग भागवामय केला होता. 


           संध्याकाळी मिरवणुकीत पारंपारिक शिवकालीन वेशभूषा केलेले बाल शिवाजी, मावळे आणि त्यांच्या जोडीला शाहीर अशा धडाकेबाज रॅलीला स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शाखाप्रमुख धनाजी चौधरी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments