कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील ग्रामीण भागातील पथदिव्यांचे बिल न भरल्यामुळे महावितरणने त्यांचा वीज पुरवठा खंडीत केल्यावरून भाजप आमदार रविंद्र चव्हाण आणि मनसे आमदार राजू पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त करत केडीएमसीने तातडीने हे वीज बिल भरण्याची मागणी केली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात २७ गावांचा भाग समाविष्ट आहे. मात्र या २७ गावांतील काही भागात पथदिव्यांचा वीजपुरवठा केडीएमसीने दिड कोटींची थकबाकी न भरल्याने महावितरणकडून खंडीत केल्याची माहिती आमदार रविंद्र चव्हाण यांनी दिली. तसेच हा भाग अंधारामध्ये गेल्याबद्दल केडीएमसी आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांबद्दल संताप व्यक्त करत महावितरणचे बिल भरणे ही तुमची जबाबदारी नाही का? असा सवाल करत लवकरात लवकर हे देयक अदा करण्याची मागणी केली आहे.
तर या सर्व प्रकाराबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनीही तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. आमदार पाटील यांनी 'अंधेर नगरी चौपट राजा' या शिर्षकाखाली ट्विट करत निशाणा साधला आहे. उद्घाटनाचे कार्यक्रम, श्रेय लाटणे आणि बॅनर लावा असा जप करण्याऐवजी कल्याण डोंबिवलीतील प्राथमिक सुविधांकडे लक्ष दिलेत तर बरं होईल आशा शब्दांत त्यांनी केडीएमसी प्रशासन आणि शिवसेनेला लक्ष केले आहे.
दरम्यान या सर्व प्रकाराबाबत केडीएमसी विद्युत विभागाकडे विचारणा केली असता संबंधित भागातील महावितरणच्या थकबाकीची रक्कम ही ग्रामपंचायत काळातील असल्याचे सांगण्यात आले. तसेच ही रक्कम वगळता संबंधित गावे केडीएमसीमध्ये समाविष्ट झाल्यापासून महावितरणची सर्व देयके नियमित भरली जात आहेत. ही बाब महावितरणच्या निदर्शनास आणून देण्यात आल्यावर त्यांनी लगेचच संबंधित भागातील स्ट्रीटलाईटचा वीज पुरवठा पूर्ववत केल्याची माहितीही विद्युत विभागाचे अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.
0 Comments