ठाणे (प्रतिनिधी) - कळवा पूर्वेत राहणार्या विद्यार्थ्यांना ठाणे-कळवा परिसरातील शाळांमध्ये जाणे सोयीचे व्हावे, या उद्देशाने गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन सदस्य शमीम खान यांच्या पुढाकाराने ठाणे परिवहन सेवेची ‘तेजस्विनी’ ही बसगाडी सुरु केली आहे. या बसगाडीमुळे सुमारे 250 विद्यार्थ्यांना शाळेत जाणे आणि घरी येणे सुकर झाले आहे.
कळवा पूर्वेकडील भास्कर नगर, वाघोबा नगर आदी भागातील सुमारे 250 विद्यार्थी कळवा तसेच ठाण्यातील महागिरी येथील अंजुमन खैरुल इस्लाम ऊर्दू हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना प्रवासाची व्यवस्था नसल्याने त्यांच्या शिक्षणात खंड पडत होता. या शाळेतील शिक्षकांनी ही बाब गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या निदर्शनास आणून दिली होती. डॉ. आव्हाड यांनी या संदर्भात परिवहन सदस्य शमीम खान यांना सदर ठिकाणी बससेवा सुरु करण्याची कार्यवाही करावी, असे आदेश दिले होते.
त्यानुसार शमीम खान यांनी सय्यद अली भाईसाहब, शहराध्यक्ष आनंद परांजपे, गटनेते नजीब मुल्ला, ऋता जितेंद्र आव्हाड, विपक्ष नेते अशरफ शानू पठान यांच्या साह्याने परिवहन सभापती, व्यवस्थापक यांच्याकडे पाठपुरावा करुन भास्कर नगर ते महागिरी अशी बससेवा सुरु करुन घेतली आहे.
आज या बससेवेला प्रारंभ झाला. शुक्रवारी सकाळी ऋता जितेंद्र आव्हाड, मिलींद पाटील, महेश साळवी आदींनी या बसगाडीला हिरवा कंदील दाखविला. ही बससेवा सुरु झाल्याने शालेय विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी शमीम खान यांचे आभार मानले आहेत.
0 Comments