
ठाणे : शहरातील अनधिकृत बॅनर्स, होर्डिंग्ज, अतिक्रमणे, साफसफाई तसेच स्वच्छता कामासाठी प्रभागसमितीनिहाय विविध पथके तयार करून स्वच्छतेची दररोजची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश देतानाच याबाबत कुठलीही हयगय खपवून घेतली जाणार नसल्याचा ईशारा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिला.
गेले तीन दिवस शहरातील विविध कामाचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. या पाहणी दौऱ्यानंतर अनधिकृत बॅनर्स, अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी तातडीने सर्व विभागप्रमुख व सहाय्यक आयुक्तांची बैठक घेतली.
या बैठकीमध्ये त्यांनी सध्यस्थितीत शहरातील अनधिकृत बॅनर्स, होर्डिंग्ज, अतिक्रमणे, रस्ते दुभाजक, फुटपाथ दुरुस्ती, साफसफाई, स्वच्छता कामाची कार्यवाही दर दिवशी वेळेत करण्याचे कडक आदेश सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले. दरम्यान प्रत्येक प्रभागासमितीमध्ये सकाळच्या वेळी नागरीकांना "मॉर्निंग वॉक" ट्रॅक तयार करून सकाळी या ठिकाणच्या वाहतूकीचे नियोजन करण्याच्या सूचना देखील त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त(१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (2)संजय हेरवाडे, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, उप आयुक्त मारुती खोडके तसेच सर्व सहाय्यक आयुक्त आदी अधिकारी उपस्थित होते.
0 Comments