कोपरी वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट, विसर्जन घाटाची महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केली पाहणी

■अॅम्पी थिएटर, सुशोभीकरणाचे काम ९० टक्के पूर्ण ; उर्वरित काम १० दिवसात पूर्ण होणार


ठाणे : ठाणे स्मार्ट सिटी लि. अंतर्गत प्रगतीपथावर असलेल्या कोपरी खाडीलगत वॉटरफ्रंट डेव्हलपमेंटच्या विविध कामाची आज प्रशासक तथा ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. यावेळी या प्रकल्पातील अॅम्पी थिएटर, सुशोभीकरणाचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम पूर्ण होताच सक्षम प्राधिकरणाशी चर्चा करून लोकार्पण करणेबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी नमूद केले.


      यावेळी माजी महापौर नरेश गणपत म्हस्के, माजी नगरसेविका मालती पाटील, नम्रता पमनानी, माजी नगरसेवक विकास रेपाळे, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, मुख्य तांत्रिक अधिकारी प्रवीण पापळकर, कार्यकारी अभियंता मोहन कलाल आदी उपस्थित होते. 


      ठाणे स्मार्ट सिटी लि. अंतर्गत कोपरी खाडीलगत वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट अंतर्गत सुशोभीकरणाचे अंतिम टप्प्यातील काम सुरू असून या सर्व कामाची महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज पाहणी केली. 


        या ठिकाणी करण्यात अष्टविनायक चौक ते गणेश विसर्जन घाट(मीठबंदर रोड )रस्ता व पदपथाचे नूतनीकरण, शौचालय,  अॅम्पी थिएटर, बैठक व्यवस्था, उद्यान, वाहनतळ, मनोरंजनात्मक सुविधा, विद्युत रोषणाई, जेट्टी रस्त्याचे नूतनीकरण, ऐतिहासिक तोफांचे जतन करण्याकरिता चौथऱ्याचे बांधकाम, दशक्रिया विधीकरिता चौथरा आदी सुविधांची त्यांनी पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. 

     

     कोपरी खाडीलगत वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट या प्रकल्पातील अॅम्पी थिएटर, सुशोभीकरणाचे काम ९० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित किरकोळ कामे येत्या १० दिवसात पूर्ण करण्यात येणार आहेत. सदरची किरकोळ सर्व कामे पूर्ण होताच सक्षम प्राधिकरणाशी चर्चा करून अॅम्पी थिएटरचे लोकार्पण करणेबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments