आठवडे बाजारात घुमला जनसेवेची कामे सांगणारा शाहिरी सूर...


ठाणे, दि.१०  (जिमाका) : लोककल्याणकारी योजना जन सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोककला माध्यमाचा वापर जिल्ह्यात केला आहे. कलापथकांच्या माध्यमातून दोन वर्षात केलेली जनसेवेची कामे पोहोचविणाऱ्या मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी आज कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप या गावांमध्ये शाहिरी आवाज दुमदुमला. ग्रामीण भागात या सादरीकरणाला मिळालेला प्रतिसाद तर नवी मुंबई सारख्या शहरी भागात देखील कलापथकांच्या सादरीकरणाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.


         कल्याण तालुक्यातील म्हारळ गावचा आज आठवडे बाजार होता. कलापथकातील कलाकारांनी वातावरण निर्मिती केली आणि शाहिरांनी खड्या आवाजात 'महाविकास आघाडी सरकारने आणल्या जन कल्याणकारी योजना'' या गाण्यातून उपस्थितांना गेल्या दोन वर्षात केलेली जनसेवेची कामे कथन केली. लोकसंगीताचा माध्यमातून जनजागृतीच्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. वरप येथील जिल्हा परिषद शाळेजवळील कार्यक्रमास परिसरातील अबालवृद्धांचा प्रतिसाद मिळाला.


          आठवडे बाजार, गावातील चौक, प्रांगण, शाळा अशा ठिकाणी लोककलांचे सादरीकरण करून शासकीय योजनांबाबत जनजागृती केली जात आहे. आज ठाणे जिल्ह्यात कोपरखैरणे, घणसोली, येऊर, आसनगाव, शहापूर, खर्डी, कसारा, कल्याण तहसील कार्यालय, म्हारळ, वरप, घोडसई येथे कार्यक्रम झाले.

Post a Comment

0 Comments