शहरातील सुशोभीकरण, रंगरंगोटी व स्वच्छता कामाच्या पाहणीसाठी महापालिका आयुक्त रस्त्यावर

अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्स व अतिक्रमणाची घेतली झाडाझडती


ठाणे  : महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा आज दुसऱ्या दिवशीही शहरातील सुशोभीकरण, फुटपाथ दुरुस्ती, रस्ते दुरुस्ती तसेच साफसफाई कामाच्या पाहणीसाठी रस्त्यावर उतरले असून अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्सची झाडाझडती घेवून रस्त्यावरील अतिक्रमणे तात्काळ हटविण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले.


      यावेळी अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, उप आयुक्त आयुक्त मारुती खोडके, उप आयुक्त मनीष जोशी, सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, कल्पिता पिंपळे, कार्यकारी अभियंता विकास ढोले, मोहन कलाल, विनोद पवार, वरिष्ठ उद्यान अधिक्षक केदार पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.


      आज महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी महापालिका भवन येथून चालतच सुशोभीकरण, खड्डे भरणे, फुटपाथ दुरुस्ती तसेच साफसफाई कामाची पाहणी करण्यास सुरुवात केली. यामध्ये डॉ.अल्मेडा रोड, राम मारुती रोड, गजानन महाराज चौक, शिवाजी पथ, मासुंदा तलाव, गावदेवी, जांभळी नाका, माँ मीनाताई ठाकरे चौक, आझाद नगर नं.२, एलबीएस रोड, जिरीमरी मंदीर परिसर, घोडबंदर रोड तसेच कापुरवाडी नाका आदी ठिकाणांच्या सुशोभीकरण, फुटपाथ दुरुस्ती, रस्ते दुरुस्ती तसेच साफसफाई कामाची पाहणी केली.


          यावेळी रस्त्यावरील डेब्रीज उचलणे, तुटलेले कफस्टोन बदलणे, फुटपाथ दुरूस्ती, रस्ते दुभाजक व ब्रिजखाली आकर्षक रंगरंगोटी-भिंतीचित्रे रेखाटन, रस्ते दुभाजकामध्ये वृक्ष लागवड करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


        तसेच सर्व रस्त्यावरील अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्स व अतिक्रमणे तात्काळ हटवून परिसर सुशोभीकरणावरभर देण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Post a Comment

0 Comments