जिल्हात महाजीविका अभियानाचा शुभारंभ ८ मार्च ते १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत अभियान


ठाणे दि. ८ (जि. प) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून जिल्हा कक्षातर्गत 'महाजीविका अभियाना' चा शुभारंभ मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी ग्रामीण भागातील महिलांच्या २२ स्वयं सहाय्यता समूहामार्फत विविध प्रकारच्या वस्तू आणि खाद्यपदार्थचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. 


          महाजीविका अभियान ८ मार्च ते १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत राबविण्यात येणार असून यानिमित्ताने विविध उपक्रम जिल्हाभर घेण्यात येणार आहेत. दरम्यान आजच्या शुभारंभ कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी केले. यावेळी त्यांनी अभियान कार्यकाळात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती देतानाच उमेद अभियानामार्फत जिल्हात विविध उपक्रम राबवून महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले.


         याकार्यक्रमाला जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार, कृषि सभापती संजय निमसे, महिला व बाल कल्याण समिती सभापती श्रेया गायकर, समाजकल्याण समिती सभापती प्रकाश तेलीवरे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ रुपाली सातपुते तसेच ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 


         महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून यंदाचे वर्ष 'उपजीविका' वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर महिला सक्षमीकरणाच्या विविध कार्यशाळा आणि जिल्ह्यातील महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंच्या, खाद्यपदार्थांच्या प्रदर्शन विक्रीचे मेळावे भरविण्यात येणार आहेत.


         या प्रदर्शनातून महिलांना आर्थिकनिर्भर बनविण्याचा शासनाचा मानस असून जिल्ह्यात या अभियानाची यशस्वी  अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा अभियान व्यवस्थापक हसन तडवी यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments