कल्याण : सातारा जिल्हातील वाई शहरातून कल्याणमध्ये आलेल्या एका तवेरा कारमधून सर्पमित्राने दुर्मिळ जातीचा मांडूळ साप कारचा पत्रा कापून शिताफीने पडकला आहे. या दुर्मिळ मांडूळ सापाला कल्याण वन विभागाचे वनपाल अधीकारी यांच्या परवानगीने निसर्गाच्या सानिध्यात सोडून जीवदान दिले आहे.
तवेरा कार चालक प्रवाशांना घेऊन रात्रीच्या सुमारास वाई गावातून निघाला होता. त्यानंतर कार कल्याण पश्चिम भागातील गौरीपाडा परिसरात आली असता सोसायटीच्या पार्किंगमध्ये झाडाखाली कारचे दारे उघडी करून उभी ठेवली होती. त्यातच दुपारच्या सुमारास प्रवाशांना घेऊन कार पुन्हा वाईला निघणार होती. त्यावेळी एका प्रवाशाने अचानक कारमध्ये साप शिरल्याचे पाहताच त्याने कार मालक तुषार भागवतला मागील सीटच्या पत्र्याखाली लाल साप शिरल्याची माहिती दिली. त्यांनतर या सापाची माहिती सर्पमित्र दत्त बोबे यांना गौरीपाडा येथील राहणाऱ्या पौर्णिमा शिंदे यांनी संपर्क करून दिली.
माहिती मिळताच सर्पमित्र दत्त हे घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी सापाचा कारमध्ये शोध घेतला. मात्र कार मधील मागच्या सिटीच्या साईट पत्र्यामध्ये हा साप दळून बसला होता. त्यामुळे त्या सापालाही बाहेर निघता येत नव्हते. त्यातच सर्पमित्राने ग्रॅन्डर कटरच्या सहाय्याने लोखंडी पत्रा कापून या मांडूळ सापाला सुखरूप बाहेर काढले. त्यातच उन्हाचा पारा पाहता या सापाला खूप वेळची तहान लागली असावी म्हणून सर्पमित्राने या मांडूळ सापाला पसरट पाण्याच्या ठिकाणी सोडले. त्यानंतर हा साप पाणी पीत असतानाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले.
मांडुळ जातीच्या सापांच्या अंगातील द्रव्य औषधासाठी उपयोगी पडत असल्याने औषध कंपन्यांकडून हे द्रव्य काढल्यानंतर त्याच्यापासून औषधे बाजारात विकली जाते. तसेच मांडूळ जातीच्या सापाची काळ्या जादूच्या नावाखालीही तस्करी केली जाते. जेवढा मोठा मांडूळ तेवढी लाखोंची रक्कम तस्कर ठरवीत असल्याचे पोलिसांनी अनेक वेळा पकडलेल्या तस्करांकडून उघडकीस आणले आहे.
हा मांडूळ साप साडेतीन फुट लांबीचा आहे. तर ज्या ठिकाणी कार उभी होती त्या आजूबाजूला तलाव व जंगल भाग असून बहुदा हा साप थंड जागेच्या शोधात कारमध्ये शिरला असावा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments