देशी पिस्तुल बाळगणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

   

■शिवजयंतीच्या मिरवणुकीचा फायदा घेत उत्तर प्रदेशहून आणली पिस्तुल...


कल्याण : शिवजयंतीच्या मिरवणुकीचा फायदा घेत उत्तर प्रदेश मधून डोंबिवलीत देशी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतुसे घेऊन येणाऱ्या आरोपीला पोलिसांनी  गोविंदवाडी परिसरातून अटक केली आहे. महेश पवनीकर असे या २२ वर्षीय आरोपीचे नाव असून तो डोंबिवली आजदेपाडा मधील रहिवासी आहे.            मात्र उत्तर प्रदेश मधून येणाऱ्या आरोपीकडे पिस्तुल सापडल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. आपण स्वसरक्षणासाठी हे पिस्तुल आणि २ जिवंत काडतूस आणल्याचा दावा आरोपीने केला असला तरी प्रत्यक्षात त्याने हे पिस्तुल कशासाठी कोठून आणले याचा पोलीस शोध घेत आहेत.


 

शिवजंयतीनिमित्ताने पोलिसांनी मनाई आदेश लागू केला होता मात्र या आदेशाचा भंग करत महेश पवनीकर या आरोपीने विना परवाना देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतूस बेकायदेशीररित्या जवळ बाळगले होते. पोलिसाच्या पेट्रोलिंग दरम्यान कल्याण पश्चिमेकडील रेतीबंद रोड नजीक गोविंदवाडी परिसरातून त्याला अटक करण्यात आली.  दरम्यान हे पिस्तुल आपण उत्तर प्रदेश मधून आणले असल्याचे सांगतानाच आपला अनेक  जणांशी वाद असून या वादातून आपल्यावर हल्ला होण्याची भीती असल्याने आपण स्वसरक्षणासाठी हे पिस्तुल स्वता उत्तर प्रदेश मधून खरेदी करून आणल्याचा दावा पोलीस तपासात केला असला तरी याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करत पिस्तुल जप्त करत आरोपीला अटक केली असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांनी दिली.

Post a Comment

0 Comments