राहनाळ शाळेत इको फ्रेंडली होळी व धुळवड उत्साहात साजरी


कल्याण :  जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथे इकोफ्रेंडली होळी व धुळवड सण साजरा करून, शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आनंद दिला. गेले चार दिवस शालेय विद्यार्थ्यांना इकोफ्रेंडली होळी कशी खेळावी? 

 
          पाणी बचत करावी, जिवंत झाड होळीसाठी तोडू नये, प्लास्टिकच्या पिशव्या किंवा फुगे एकमेकांवर मारू नयेत, केमिकल मिश्रित रंगांचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने रंग तयार करून होळी साजरी करावी असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला होता. अजय पाटील लिखित, दिग्दर्शित धुळवड लघुपट सर्व विद्यार्थ्यांना दाखवला गेला.


          शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने नैसर्गिक रंग तयार केले. बीट, पालक भाजी, गाजर, हळद यांपासून नैसर्गिक रंग तयार तयार केले. त्याअगोदर शाळेच्या परिसरात साफसफाई करून विद्यार्थ्यांनी केर कचरा गोळा केला. पताका, रांगोळ्या काढून सजावट केली. 
         होळी दहन करण्यासाठी गोवर्‍या आणि कापूर यांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करून आजूबाजूचं वातावरण शुद्ध करण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमाचे संकल्पना शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांची असून नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी चित्रा पाटील आणि रसिका पाटील यांनी पुढाकार घेतला. 


          होळीचा सण आपण का साजरा करतो? होलीकेची  कथा अनघा दळवी यांनी सांगितली. शिक्षकांनी मुलांसोबत होळीची गाणी गायली. विद्यार्थ्यांनां पाणीबचत व इकोफ्रेंडली होळी धुळवड साजरी करण्याची शपथ दिली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रमिला कडू, प्रतिभा नाईक, पालक सुदाम जाधव उपस्थित होते. होळीची यथासांग पुजा करुन इयत्ता पहिली व दुसरीच्या मुलींनी होळी पेटवली.


          शाळेतील विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली रंग तयार करून अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने होळीचा सण साजरा केला. गटशिक्षणाधिकारी निलम पाटील, सरपंच राजेंद्र मढवी, शिक्षण विस्तार अधिकारी संजय अस्वले, केंद्र प्रमुख विजयश्री गवळी तसेच राहनाळ ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

Post a Comment

0 Comments