कल्याण : पालघरमधील झडपोली गावात जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचा भव्य महिला मेळावा पार पडला. या मेळाव्यात पालघर आणि ठाणे जिल्ह्यातून आलेल्या पंधरा हजारांपेक्षाही जास्त महिला सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यासमोर बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी उपस्थित महिलांना कोकण पट्ट्यात नवं जग घडवण्याचं आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला उपस्थित महिलांनी टाळ्यांच्या कडकडाटानं प्रतिसाद दिला.
निलेश सांबरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मनाला हात घालणारं आवाहन केलं. ते म्हणाले, "पुरुषाविना जगाची कल्पनाही केली जावू शकते. पण स्त्रीविना शक्यच नाही. ती जगनिर्माती. ती जग घडवणारी. तीच सारं काही. आताही मला तुमच्याकडून अपेक्षा आहे. तुम्ही नव्या जगाला नित्य जन्म देत असता. आता घडवायचं आहे.
तुम्ही ते करणारच याची मला खात्री आहे. आता आपल्याला स्वातंत्र्यानंतरची नवी लढाई लढायची असल्याचं आवाहन करून ते म्हणाले की, रस्ते पाणी वीज सारख्या मूलभूत सोयी सुविधा, समाज सक्षम करण्यासाठी नव्याने लढाई लढावी लागेल. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज बाजूच्यांच्या नाही तर प्रत्येक घरात जन्माला आले पाहिजेत, असंही ते म्हणाले.
त्यांनी आपल्या भाषणात ठाणे पालघर पट्टयातील ते गरोदर तरुणी आणि त्यांच्या पोटातील बाळांच्या मृत्यूच्या समस्येचा उल्लेख केला. ती सोडवण्यासाठी जिजाऊच्या वतीने प्रयत्न वाढवण्याचीही त्यांनी ग्वाही दिली. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत सुधारणा घडवण्याची आवश्यकता बोलून दाखवली. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे महिलादिनानिमित्त आयोजित भव्य दिव्य सोहळा ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यातून १५ हजार महिलांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात पार पडला.
आरोग्य यंत्रणा, कायदा व सुव्यवस्था समर्थपणे सांभाळणाऱ्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील आशाताई, परिचारिका, डॉक्टर, पोलिस व स्वयंरोजगार करणाऱ्या महिला तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
महिलांच्या मेळाव्यासाठी अॅड. हेमांगी दत्तात्रय पाठारे, अॅड. शबनम काझी आणि अॅड. सुजाता जाधव या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे, त्यांच्या आई भावनादेवी सांबरे, जिजाऊ संस्था महिला सक्षमीकरण प्रमुख जि.पालघर हेमांगी पाटील, जिजाऊ संस्था महिला सक्षमीकरण प्रमुख जि.ठाणे, मोनिका पानवे व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
0 Comments