राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा बुधवारी भिवंडीतुन विधानभवनावर निर्धार मोर्चा धडकणार


भिवंडी दि.7 (  प्रतिनिधी ) राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी, सुधारित किमान वेतन लागू करणे,निवृत्ती वेतन देणे आणि ईतर विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनने मुख्यमंत्र्यांना साकडे घालून १मार्च पूर्वी मागण्या मंजूर करण्याचे निवेदन दिले होते .


              अन्यथा ९मार्च रोजी विधानभवनावर निर्धार मोर्चा आयोजित करण्याचा इशारा दिला असतानाही त्यांच्या मागण्यांवर कोणत्याही प्रकारचा विचार न केल्याने राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांचा विधानभवनावर निर्धार मोर्चा काढण्यात येणार असल्याचे कोकण विभागीय अध्यक्ष विकास भोईर व  कार्याध्यक्ष दत्तात्रय भोईर यांनी भिवंडीतील शेलार येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.


         राज्यातील २७ हजार ९२० ग्रामपंचायतीमध्ये काम करीत असलेल्या ६० हजार कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न मागील २० वर्षांपासून प्रलंबित असून त्याबाबत याआधीही वेगवेगळ्या पध्दतीने युनियनने शासन दरबारी गाऱ्हाणे मांडले होते.


            परंतु आजतागायत यावर कोणतीही कार्यवाही झाली नसून शासनदरबारी कागदी घोडे नाचविण्याचे काम चालू असून त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून कोरोनाच्या कालावधीत जीवाची पर्वा न करता त्यांनी आपले कर्तव्य निभावले तरीही शासन दखल घेत नसल्याने त्यांच्यात मोठा असंतोष पसरला असून यामुळेच आम्ही १मार्च पर्यंत आमच्या मागण्यांवर विचार न केल्यास निर्धार मोर्चा विधान भवनावर आणून राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवू असा इशारा दिला होता. 


         त्यामुळे आमच्या मागण्यांचा विचार न झाल्याने बुधवारी ९ मार्च रोजी सकाळी १० वाजता भिवंडीतील मानकोली नाका येथे जमा होऊन तेथून राज्यातील हजारोंच्या संख्येने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा लॉंग मार्च विधानभवनावर धडकणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा अध्यक्ष अजय जाधव आणि भिवंडी तालुका अध्यक्ष श्याम भोईर यांनी दिली.

Post a Comment

0 Comments