"स्वच्छ सर्वेक्षण २०२२" अंतर्गत विविध कामांचा महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी घेतला आढावा अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन व त्याची अंमल बजावणी करण्याचे दिले आदेश

■केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मोहिमे बाबत आयोजित बैठकीत बोलताना अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे सोबत वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी हळदेकर.  


ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरू असलेल्या "स्वच्छ सर्वेक्षण २०२२" मोहिमेंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध कामांचा महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी आज आढावा घेवून या स्पर्धेत देशात अव्वल येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश सर्व विभाग प्रमुखांना दिले. दरम्यान या मोहिमेंतर्गत येत्या ३ दिवसात शहर स्वच्छतेसह इतर अत्यावश्यक सर्व कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


           केंद्र शासनाच्यावतीने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरी भागातील स्वच्छतेचे मुल्यांकन करण्यासाठी ’स्वच्छ सर्वेक्षण २०२२’या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी आज महापालिकेच्या कैं. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेवून केंद्र शासनाच्यावतीने सन २०२२ साली होणा-या स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमातंर्गत विविध घटकांची चर्चा करून त्यातील घटकनिहाय नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.  


        स्वच्छ सर्वेक्षण २०२२ स्पर्धेत ठाणे शहर सहभागी झाले आहे.  ठाणे शहराला स्वच्छ, सुंदर बनवण्याची जबाबदारी प्रत्येकाची असून महापालिकेच्या कार्यकारी अभियंता, उप अभियंता, उप मुख्य स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता निरीक्षक यांनी कशा पद्धतीने या मोहिमेत काम केले पाहिजे याबाबत अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी या बैठकीत निर्देश दिले.


        शहरातील सार्वजनिक शौचालयातील नळ व्यवस्था, पाणी पुरवठा, साफसफाई, सार्वजनिक शौचालयांना नळ संयोजने, विद्युत व्यवस्था, ड्रेनेज व्यवस्था तसेच परिसर स्वच्छता आदी गोष्टी अद्ययावत ठेवून सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान प्रत्येक प्रभाग समितिनिहाय शहरातील अनधिकृत बॅनर्स, होर्डिंग तात्काळ काढून टाकण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले.         

Post a Comment

0 Comments