
ठाणे : सलग तिसऱ्या दिवशीही शहरातील सुशोभीकरण, साफसफाई कामाचा पाहणी दौरा सुरूच असून आज आनंदनगर ते कोरम मॉल परिसरातील साफसफाई, रंगरंगोटी, रस्ते दुरुस्ती तसेच फुटपाथ दुरुस्ती कामाची महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पाहणी केली. दरम्यान रस्त्यावरील डेब्रीज, अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्स व अतिक्रमणे तात्काळ हटविण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.
आज सकाळी ११.०० वाजता महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आनंदनगर येथून सुशोभिकरण कामाची पाहणी करण्यास सुरूवात केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उप आयुक्त मारुती खोडके, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, उप आयुक्त मनीष जोशी, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, उप नगर अभियंता विनोद गुप्ता, सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, सचिन बोरसे, कार्यकारी अभियंता विकास ढोले, विनोद पवार, चेतन पटेल, नजीम काझी, धनंजय मोदे, दिलीप शिलावंत, प्रकाश खडतरे, प्रशांत फाटक, महेश बहिरम, वरिष्ठ उद्यान अधिक्षक केदार पाटील तसेच इतर महापालिका अधिकारी आदी उपस्थित होते.
या पाहणी दौऱ्यामध्ये त्यांनी आनंदनगर चेक नाका, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक, इंटर्निटी मॉल, तीन हात नाका, नितीन कंपनी तसेच कोरम मॉल आदी परिसरातील साफसफाई, रंगरंगोटी, वृक्ष लागवड, फुटपाथ दुरुस्ती तसेच मेट्रोच्या कामाची पाहणी केली.
शहर सौंदर्यीकरणांतर्गत भिंती, चौक, रस्ते दुभाजक, गार्डन्स तसेच फ्लायओव्हरवर रंगरंगोटी करून शहर सुंदर बनवण्याचे काम सुरु असून ही सर्व कामे अजून प्रभावीपणे करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागास दिल्या. तसेच रस्त्यावरील डेब्रीज उचलणे, अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्स व अतिक्रमणे तात्काळ हटविण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले.
शहरात मेट्रोचे काम सुरू असून ज्या ठिकाणी काम सुरू नाही अथवा काम बंद आहे तेथील बॅरिकेट तात्काळ हवण्याचे आदेश मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच काम सुरू असलेल्या ठिकाणी असलेल्या गटर्सची साफसफाई करून तेथील माती व इतर साहित्य तात्काळ उचलण्याचे आदेशही त्यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिले.
0 Comments