महा. अंनिस तर्फे ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ उपक्रम


कल्याण : पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी होळी लहान आणि शक्यतो लाकडे न वापरताच करावी, देवीला पोळीचा नैवेद्य दाखवून पोळी होळीमध्ये अर्पण न करता महा. अंनिस कार्यकर्त्यांकडे द्यावी, रासायनिक रंग न वापरता सुरक्षित होळी साजरी करावी, पाण्याचा अपव्यय टाळावा आणि अपशब्द / शिव्यांचा वापर टाळावा हे आवाहन नागरिकांना करून महा. अंनिस, ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली आणि भिवंडी या शाखांतील कार्यकर्त्यांनी ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे या वर्षीही उत्साहाने राबवला. 


         कल्याण पूर्वेतील शिवसमर्थ कॉलनी, वक्रतुंड प्लाझा, गुरुदत्त अपार्टमेंट, विघ्नहर्ता कॉलनी, आई गावदेवी सोसायटी, श्री ज्योतिर्लिंग सोसायटी, द्वारकामाई प्लाझा, श्रीराम मित्रमंडळ येथील होलिकोत्सव मंडळांनी तसेच कल्याण पश्चिमेतील काही संकुलांतील नागरिकांनी महा. अंनिसच्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 
         त्यांनी महा. अंनिसचे कार्यकर्ते डॉ. सुषमा बसवंत, शरद लोखंडे, राजेश देवरुखकर, संतोष मात्रे, कृष्णा पवार, उत्तम जोगदंड यांच्याकडे एकूण सुमारे ५०० पुरणपोळ्या गोळा करून दिल्या. वालधुनी परिसरातील होलिकोत्सव मंडळांकडून महा. अंनिसचे कार्यकर्ते रोहित डोळस, प्रवीण पाठारे, नितीन वानखेडे आणि ए. सी. साहू यांनी पुरणपोळ्या गोळा केल्या. नंतर या पोळ्यांचे वाटप कल्याण स्टेशन, बस स्टॅण्ड, आंबेडकर उद्यान परिसरातील फुटपाथवर राहणार्‍या गरीब लोकांना करण्यात आहे. 


          महा. अंनिसच्या डोंबिवली शाखेतर्फे डोंबिवली पश्चिम येथील गावदेवी शाळेत विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. त्यांनी दान दिलेल्या पोळ्या स्वीकारण्यात आल्या. या पोळ्यांचे वाटप डोंबिवली रेल्वे स्टेशन, अन्य वस्त्या, कचरावेचक वस्ती तसेच फुटपाथवर राहणार्‍या गरीब लोकांमध्ये करण्यात आले .           भिवंडी शाखेचे कार्यकर्ते विनोद म्हात्रे यांनी आठगाव विद्या मंदिर या कोनगाव  येथील शाळेत पर्यावरण पूरक होळी व रंगपंचमी कशी साजरी करावी याबद्दल मार्गदर्शन केले. संध्याकाळी विविध होलिकोत्सव मंडळांकडून पुरणपोळ्या स्वीकारण्यात आल्या आणि त्यांचे वाटप विनोद म्हात्रे, गणेश शेलार, सुरेश साळवे, संतोष म्हात्रे, पि बी मोरे या कार्यकर्त्यांनी गरीब वस्तीत केले. 


           आपल्या पुरणपोळ्या होळीत जळून नष्ट होण्याऐवजी गरिबांच्या मुखात जात आहेत, त्यांना देखील होळीनिमित्त गोडधोड खायला मिळत आहे या बद्दल सर्व होलिकोत्सव मंडळांनी आणि संबंधित नागरिकांनी आनंद व्यक्त केला आणि या उपक्रमाचे स्वागत केले. त्यासाठी प्रबोधन केल्याबद्दल महा. अंनिसचे त्यांनी आभार मानले. 


          तसेच महा. अंनिसच्या अन्य विविध उपक्रमांत सामील होण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले. फुटपाथवरील आणि अन्य वस्तीतील गरीब लोकांनी देखील सणावाराला पुरणपोळी खायला मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. 

Post a Comment

0 Comments