हिम्मत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा माजी आमदार नरेंद्र पवार यांचे महाविकास आघाडी सरकारला आव्हान

   

■चार राज्यांच्या निकालाचे कल्याण मध्ये भाजपकडून सेलिब्रेशन...


कल्याण : हिम्मत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा असे आव्हान भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी महाविकास आघाडी सरकारला केले आहे. चार राज्यांमध्ये भाजपाला मिळालेल्या यशानंतर कल्याण पश्चिमेत भाजपाकडून जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांच्यासह इतर अनेक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते जल्लोषात सहभागी झाले होते.


मिनी लोकसभा म्हणून पाहिले गेलेल्या देशातील उत्तर प्रदेशसह ५ राज्यातील निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यामध्ये राज्यात विजयी घोडदौड करणाऱ्या भाजपने सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला. कल्याण पश्चिमेत भाजपतर्फे या विजयाचे जोरदार सेलिब्रेशन झालेले पाहायला मिळाले. कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पश्चिमेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी जंगी आनंदोत्सव साजरा केला. ढोल ताशावर बेभान होऊन नाचणारे कार्यकर्ते आणि विजयाची जोरदार घोषणाबाजी असे काहीसे चित्र यावेळी पाहायला मिळाले.


या निवडणूक निकालांवरून आजही देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचेच स्पष्ट झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर गोव्याच्या जनतेने विश्वास ठेवून पुन्हा भाजपाचा मुख्यमंत्री बसविला आहे. त्याच देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात देखील सत्ता आणली होती मात्र शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसल्याने त्रिकोणी सरकार आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार मध्ये हिम्मत असेल तर पुन्हा निवडणुका घेऊन दाखवा, देवेंद्र फडणवीस तुमच्या चारीमुंड्या चीत करतील असा इशारा नरेंद्र पवार यांनी यावेळी दिला.  


       तर कोरोना काळात मोदी सरकारने आणि भाजपाने जे काम केले आहे त्याचाच परिणाम आज चार राज्यात दिसून येत असून येणाऱ्या काळात कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत देखील येथील जनता भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून आम्हाला संधी देईल असा विश्वास यावेळी शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments