जल शक्ती अभियान यशस्वी पणे राबविणार – मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे जिल्हा परिषदेने घेतली 'कॅच द रेन' अंतर्गत जल शपथ

 


ठाणे दि. २९  (जि. प ) :  भारताचे महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविद यांच्या  शुभहस्ते आज देशभर जलशक्ती अभियान अर्थात ‘पडेल तेंव्हा पावसाचे पाणी अडवा आणि जिरवा' (Catch the rain, where if falls and when it falls)  या अभियानाचा शुभारंभ झाला. हे अभियान  जिल्हाच्या ग्रामीण भागात यशस्वीपणे राबवून भूजल पातळी वाढण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी  दिली. 

 

या शुभारंभ कार्यक्रमास दूरदृश्यप्रणालीद्वारे डॉ. दांगडे उपस्थित होते. दरम्यान, या अभियानाचा भाग म्हणून जिल्हा परिषद मुख्यालय, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावर जल शपथ घेण्यात आली. तसेच या अभियानाची ग्रामसेवक , सरपंच यांनी गावसभा घेत गावकऱ्यांना माहिती दिली. या शुभारंभ कार्यक्रमास ग्रामपंचायतचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, पाणी पुरवठा विभागाचे प्रकल्प संचालक दादाभाऊ गुंजाळ तसेच पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच दूरदृश्यप्रणाली द्वारे उपस्थित होते.


जलशक्ती मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने या वर्षी राज्यातील सर्व ग्रामपंचायतमध्ये हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्हातील ४३१ ग्रामपंचायतमध्ये या अभियानाची काटेकोरपणे अमलबजावणी होण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी  गावात जेव्हा जेव्हा पाऊस पडेल, तेंव्हा पावसाचे पाणी अडविण्यासाठी, जमिनीत जिरविण्यासाठी किंवा पाणी  साठवून ठेवण्यासाठी गावाच्या  शिवारात विविध विभागामार्फत वेगवेगळ्या प्रकारची कामे हाती घेण्यात येणार आहेत. 


यासाठी गाव पाऊस आराखडा तयार करण्यात येणार आहे. या आराखड्यामध्ये गावात पावसाळयापूर्वी आणि पावसाळ्यानंतर हाती घ्यायच्या कामांचा समावेश करण्यात येणार आहे. यामध्ये जलसंधारण कामे, छतावरील पाणी अडविण्याचे कामे, पारंपारिक जलस्त्रोत पुननरविकरण आणि मजबूतीकरण करणे, हातपंप आणि विहिरी पुनर्भरणाची कामे करण्यात येणार आहेत.

Post a Comment

0 Comments