ठाण्यात १२ ते १४ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरण मोहिमेचा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या हस्ते शुभारंभ


ठाणे : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ठाणे महापालिकेच्यावतीने १२ ते १४ वर्ष वयोगटातील लाभार्थींच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज पार्किंग प्लाझा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथे प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा याच्या शुभहस्ते करण्यात आला.


         यावेळी उप आयुक्त मनिष जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, डॉ. शेख अयाझ अम्मेन, कोव्हिड समन्वय आधार कुलकर्णी, गटाधिकारी संगीता बामणे, शाळेचे शिक्षक, शिक्षिका आदी उपस्थित होते.


        १२ ते १४ वर्ष वयोगटातील लाभार्थीच्या लसीकरणाकरिता शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार फक्त कॉर्बोव्हॅक्स (Corbevax) लसीचा वापर करण्यात येणार असून ठाणे महापालिकेस ३५,००० डोस उपलब्ध झाले आहेत. आजच्या पहिल्या दिवशी आज पार्किंग प्लाझा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथे लसीकरण सुरू झाले आहे. तर उपलब्ध होणाऱ्या लसीकरण साठ्यानुसार महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार असून याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.


       या लसीचे दोन डोस लाभार्थीला २८ दिवसांच्या अंतराने देण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत कोविड संसर्ग कमी असला तरी या शहरातील सर्व पालकांनी आपल्या १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या संरक्षणासाठी लवकरात लवकर लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.      


        दरम्यान ठाणे महापालिका क्षेत्रात लसीकरण मोहिमेंतर्गत आजपर्यंत पहिला डोस १६ लाख ३४ हजार ४१२ नागरिकांना तर १३ लाख ६१ हजार ७५८ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. शहरात आतापर्यंत ४८ हजार ९६३ जणांना बूस्टर डोस देण्यात आला आहे.      
चौकट


■उष्णतेची तीव्रता वाढत असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी: महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा


          प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या पुर्वसूचनेनुसार दोन दिवस तापमानात मोठी वाढ होत असून या दिवसांत उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात काल ४३ C तापमानाची नोंद झाली आहे. त्याअनुषंगाने नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, विनाकारण घराबाहेर पडू नये, या काळात जास्तीत जास्त पाणी प्यावे, घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसेच याकाळात गरोदर महिला व लहान मुलाची विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments