पोवाडे, भारूड, लोकगीतांतून शासकीय योजनांचा जागर


ठाणे, दि.११ (जिमाका) : विकासाचं वारं..माझं महाविकास आघाडी सरकारं..या गीतातून राज्य शासनाने दोन वर्षांत राबविलेल्या योजना आणि केलेली जनसेवेची कामे जिल्ह्यातील गावोगावीचे चौक, शाळा, पटांगणं, वस्त्या पाड्यांमध्ये ऐकू येत आहेत. कलापथकांच्या संचातील गायकांच्या दमदार आवाजात योजना पोहोचविण्याचे काम सुरू आहे.


             माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने लोककलेच्या माध्यमातून विकास कामांचा जागर करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारने स्वीकारलेली धोरणे, घेतलेले निर्णय, केलेल्या कार्याची माहिती याद्वारे ठाणे जिल्ह्यातील विविध भागात पोचविण्यात येत आहे. 


              शासनाच्या योजना सामान्य जनतेला सोप्या पध्दतीने समजण्यास मदत व्हावी  यासाठी लोककला या प्रभावी माध्यमाव्दारे प्रचार व प्रसिध्दीची मोहिम राबविण्यात येत आहे. कलापथकांच्या उत्कृष्ट सादरीकरणातून ही मोहिम यशस्वी होत आहे. कलाकरांनी सादर केलेल्या कविता, पोवाडे, लोकगीत, भावगीतांच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे.


            आज ठाणे जिल्ह्यात वाघबीळ, ओवळा, दिवा, मुंब्रा, दिवे अंजूर, भिवंडी तहसील कार्यालय, महापोली, अंबाडी नाका, शेणवा-शहापूर, डोळखांब, किन्हवली, टाकी पठार याठिकाणी कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.

Post a Comment

0 Comments