ब्रह्मांड कट्टा अतंर्गत ब्रह्मांड महिला परिवार संघाची कष्टकरी आदिवासी व पाड्या वरील महिलांना 'महिला दिन' कार्यक्रमाची खास भेट


ठाणे , प्रतिनिधी : ठाणे‌ शहरातील सुप्रसिद्ध सामाजिक सांस्कृतिक संस्था ब्रह्मांड कट्टा सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते. यंदा महिला दिनाचे औचित्य साधून ब्रह्मांड कट्टा अंतर्गत ब्रह्मांड महिला परिवार संघाने धर्माचा पाडा ब्रह्मांड येथील कष्टकरी महिलांसाठी शैक्षणिक, सामाजिक तसेच मनोरंजक अशा परिपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शीतल बोपलकर यांच्या सुश्राव्य ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्वप्रथम युरोपच्या विश्वसुंदरी स्पर्धेत उपविजेतेपद जिंकलेल्या ऋजुता देशपांडे यांनी महिलांशी सुसंवाद साधत त्यांना बोलते केले. 


        रोजच्या धकाधकीच्या जीवनात इतरांसाठी वेळ काढताना स्वत: मध्ये दडलेल्या आपल्या ईच्छा आकांक्षांना मार्ग कसा मोकळा करुन द्यावा यावर त्यांनी प्रभावीरित्या भाष्य केले. यामुळे स्त्रियांचे मनोबल व आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. याचबरोबर ऋजुता यांनी घेतलेल्या विविध खेळांचा महिलांनी मनसोक्त आनंद लुटला. डॉ. श्वेता शेलार या आयुर्वेदिक डॉक्टरांनी महिला आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. विविध स्त्रीव्याधी, त्यावरील आयुर्वेदिक उपचार याची त्यांनी माहिती दिली. श्वेता यांनी स्वत: तयार केलेल्या फेस पॅकचे वाटप केले. वैयक्तिक स्वच्छता माहिती अंतर्गत मोफत सॅनिटरी पॅड्स वाटप करण्यात आले. 


         ब्रह्मांड कट्टा कलासंस्कारच्या अध्यक्षा वर्षा गंद्रे यांनी स्त्रियांना प्रिय असा मेंदी काढण्याचा उपक्रम राबवला. स्पर्धेत जिंकलेल्या महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली तसेच लकी ड्रॉ मध्ये जिंकलेल्या महिलेला मानाची साडी भेट देण्यात आली. याप्रसंगी महिला दिनाचे औचित्य साधून आदिवासी पाड्यावर कार्यरत,'स्त्री कर्तव्य सन्मान' या पुरस्कारप्राप्त पार्वती ऊघाडे यांचा सत्कार ब्रह्मांड महिला परिवार संघाच्या अध्यक्षा स्नेहल जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. 


       याप्रसंगी ब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक राजेश जाधव यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या व स्त्री सबलीकरणासाठी ब्रह्मांड कट्टा सदैव बांधिल असेल असे आश्वासन दिले. हातावर पोट असणा-या आपल्या भगिनींना रोजच्या व्यस्त जीवनातुन काही विरंगुळ्याचे हक्काचे क्षण ही आमची या महिलांना महिलादिनानिमित्त भेट आहे असे प्रतिपादन ब्रह्मांड महिला परीवार संघाच्या अध्यक्षा स्नेहल जोशी यांनी केले.

Post a Comment

0 Comments