पाणी प्रश्नावर रिपब्लिकन सेनेचे आंदोलन...पाणी द्या अन्यथा पालिका आयुक्तांच्या दरवाज्या समोर निदर्शने करण्याचा इशारा


डोंबिवली ( शंकर जाधव ) २७ गावे कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट होऊन ६ वर्ष उलटली. परंतु गावांतील पाणी प्रश्न सोडविण्यास अद्याप पालिका प्रशासनाला यश आले नाही.काही गावांत तर पाणी टंचाईमुळे पैसे देऊन टॅकरने पाणी मागवणे लागत आहे.या समस्येवर पाच वर्षापूर्वी रिपब्लिकन सेनेने पालिकेचा जाहीर निषेध करत उपोषण केले होते.सोमवारी रिपब्लिकन सेनेने डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर आंदोलन केले. पाणी द्या अन्यथा पालिका आयुक्तांच्या दरवाज्यासमोर निदर्शने करण्याचा इशारा आंदोलनात देण्यात आला.

      

       या आंदोलनात रिपब्लिकन सेनेचे कल्याण-डोंबिवली शहर अध्यक्ष तथा ठाणे जिल्हा निमंत्रक आनंद नवसागरे, २७ गाव विभागप्रमुख आनंद पारदुले,शहर संघटक ज्ञानेश्वर खडसे,ग्रामीण सचिव समाधान वानखेडे,ज्येष्ठ समाजसेवक जितेंद्र म्हात्रे,कल्याण महासचिव विक्रम खरे,भारतीय बौद्ध महासभा संघटक बाबुराव नवसागरे,गणपत शेळके, दगडू दवसे यांसह ग्रामीण भागातील छबूबाई नवसागरे,मीना म्हात्रे, केतन म्हात्रे,सुनील राजबर आदी उपस्थित होते. आधी इंदिरा चौकात आंदोलनकर्त्यांनी पालिकेचा जाहीर निषेध करत पाणी प्रश्न लवकर सोडविण्याची मागणी केली.त्यानंतर डोंबिवली विभागीय कार्यालयासमोरही आंदोलन करण्यात आले. रिपब्लिकन सेनेच्या शिष्टमंडळाने डोंबिवली पाणी पुरवठा विभागाचे अभियंता राजेंद्र पाखले यांची भेट घेऊन निवदेन दिले.पाणी प्रश्नावर काही दिवसात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आले. 

   

         याबाबत नवसागरे यांना विचारले असता ते म्हणाले, सणासुदीच्या दिवसात पाणी पुरवठा व्यवस्थित होतो.त्यानंतर पुन्हा कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो.पालिकेच्या ह्या खेळात `जादूचे पाण्याचे पाईपलाईन आहेत का` अशी खिल्ली उडवली.आम्हाला आश्वासन नको, गावांत पाणी पुरवठा व्यवस्थित करा अशी मागणी करण्यासाठी आंदोलन केले.पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी फक्त पाच दिवस बिना अंघोळीचे राहावे,मग त्यांना नागरिकांच्या समस्या समजतील असेही नवसागरे म्हणाले.

 

चौकट


 पालिकेचे आश्वासन हे गाजरच ..

 

       पाणी प्रश्न सोडवू, यावर चर्चा करून नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा करू असे आश्वासन रिपब्लिकन सेनेला दिलेले आश्वासन हे गाजरच आहे.गावांना पाणी पुरवठा व्यवस्थित केला जात नसल्याने याचे उत्तर पालिका आयुक्तांना जनतेला दिले पाहिजे. नागरिकांना किती दिवस आश्वासनाचे गाजर नको, लवकरात लवकर पाणी प्रश्न सोडविला नाही तर रिपब्लिकन सेना पालिका आयुक्तांच्या दरवाज्यासमोर आंदोलन करतील असा इशारा यावेळी नवसागरे यांनी दिला.


पाईललाईन नव्हे जादूची लाईन..


     सणासुदीला पाणीपुरवठा व्यवस्थित केला जातो,मात्र त्यानंतर कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो. पाणी पुरवठा व्यवस्थेतील या प्रकारावर रिपब्लिकन सेनेचे कल्याण-डोंबिवली शहर अध्यक्ष तथा ठाणे जिल्हा निमंत्रक आनंद नवसागरे यांनी `पाईललाईन नव्हे जादूची लाईन` अश्या शब्दात खिल्ली उडवली.


Post a Comment

0 Comments