शिवकालीन गडतोफांना सह्याद्री प्रतिष्ठानने दिली नवसंजीवनी


कल्याण : शिवकालीन गडतोफांना सह्याद्री प्रतिष्ठानच्या कल्याण अंबरनाथ विभागासह महाराष्ट्र तील  मावळ्यांनी नवसंजीवनी दिली. नाशिक जवळील मुल्हेर गडाच्या जंगलात कित्येक वर्षांपासून पडलेल्या गडतोफांना कल्याण च्या दुर्गसेवकांनी गडावर नेत विराजमान केले.


मुल्हेर गड हा नाशिक पासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर असलेला इतिहास काळातील एक अतिमहत्त्वाचा किल्ला नाशिक जिल्ह्यातील मुल्हेर ग्रामपंचायतीच्या हद्दीत वसलेला आहे. इतिहास चाळून पाहिला तर गडांचे रक्षण करण्यासाठी "शिवप्रसाद" आणि "रामप्रसाद" अशा दोन तोफा स्थानापन्न होत्या असे दिसून येते. पण जसजसा काळ ओसरला दिवस पुढे सरकले तसं तसं ज्या तोफांनी गडाचे रक्षण केले त्या तोफांचे पतन होण्यास सुरुवात झाली. 


कित्येक वर्षे गडाची सेवा करून झाल्यानंतर या तोफा सुमारे दोनशे वर्षेपासून गडाच्या खाली असलेल्या दरीत पडून होत्या. कित्येक वर्षांपासून दरीत कोसळलेल्या ह्या दोन्ही तोफांना सह्याद्री प्रतिष्ठानच्या कल्याण विभागाने राज्यातील इतर तालुक्यातील दुर्गसेवकांना घेऊन दरीत पडलेल्या या तोफा पुन्हा गडावर विराजमान करून त्यांना नवसंजीवनी मिळवून देऊन एक इतिहास रचला.


तोफांचा अभ्यास केला तर एक एक तोफांचे वजन हे सुमारे दोन हजार किलो आहे. पण सह्याद्री प्रतिष्ठानच्या शेकडो दुर्गसेवकांनी एकीचे बळ दाखवत ह्या तोफा पुन्हा गडावर विराजमान केल्या. या तोफा विराजमान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे पुरातत्व विभाग आणि मुल्हेर ग्रामपंचायत ह्यांनी विशेष सहकार्य केले. तोफांचे वजन पाहता पुर्ण दिवसाची मेहनत असल्याने जमलेल्या दुर्गसेवकांनी सुमारे १५ तास अन्न पाण्याचा त्याग करून दुर्गसेवेचा हा वसा पूर्ण करून गडावर पुन्हा तोफा बसवल्या. 


या शिवकार्याला कल्याण विभागाच्या वतीने भूषण पवार, वैष्णवी गोरे, सोमनाथ पांचाळ, राहुल पवार, अभिषेक चव्हाण, स्वप्नील परब, शैलेश घोलप आणि दिनेश पादारे आदींचा सहभाग होता.

Post a Comment

0 Comments