डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागात झोपड्या-टपऱ्यांना उधाण भुमाफियांवर संयुक्त कारवाई करण्याची मागणी


डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील सर्व्हिस रोडला असलेल्या हायटेन्शन वायरजवळ असलेल्या इंपिरियल टॉवर/सिमेन्स सोसायटीसमोर एमआयडीसीच्या मोकळ्या भूखंडावर झोपड्या बांधण्याचे काम जोरात सुरू आहे. काही भूमाफिया आणि ठेकेदार सदर झोपड्या बांधून घेत असून वेळीच त्यात लक्ष घातले नाही तर येथे मोठी झोपडपट्टी निर्माण होण्याची भीती रहिवाश्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


      या नव्यानेच उदयास येणाऱ्या झोपडपट्टीत अनेक गोरखधंदे बिनबोभाट सुरू असून त्यामुळे या भागातील सर्वांना त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. विशेष म्हणजे या झोपड्यांत राहणाऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसल्याने तेथील रहिवासी उघड्यावरच लघुशंका आणि प्रात:र्विधी उरकत असतात. परिणामी या भागात प्रचंड दुर्गंधी आणि रोगराई वाढली आहे.


            तेथूनच जमिनीखालून उच्च दाब पेट्रोलियम उत्पादन पाईपलाईन, तर बाजूने पाण्याच्या मोठ्या पाईपलाईन जात आहेत. सदर मोकळी जागा एमआयडीसीच्या मालकीची आहे. हायटेन्शन वायरखालील अशा काही जागा तात्पुरत्या भाडे तत्वावर झाडे लावणे, उद्यानाकरिता संस्थेला देण्यात येतात. परंतु एमआयडीसीच्या किचकट नियम, जाचक अटी व शर्तींमुळे, तसेच त्यात न परवडणारे शुल्क आकारण्यात येत असल्याने सदर भूखंड पडून आहेत. 


          अशी परिस्थिती असताना अनधिकृत बांधकामे, अवैध झोपड्या आणि त्यांतून चालणारे गोरख धंदे होत असतील तर पोलिस, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) प्रशासनाचे याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते, हे विशेष. निवासी विभागात झोपड्या आणि टपऱ्या बांधण्याचे काम जोरात सुरू आहेत. ऊसाचा रस, थंड पेय, खाण्या-पिण्याच्या, टायर दुरुस्ती, गॅरेजेस्, इत्यादी सर्व प्रकारच्या हातगाड्या, टपऱ्या जागोजागी उभारण्यात आल्या आहेत. 


         त्यापासून निर्माण होणाऱ्या घाणीवर रोगराई पसरविणाऱ्या माशा, कीटक, डास मच्छारांचा प्रदुर्भाव वाढल्याचे दिसून येते. तर या भागात अस्वच्छता मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. कावेरी चौक, बाज आर. आर. हॉस्पिटल, उस्मा पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर अनधिकृत फेरीवाल्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. झोपड्या, टपऱ्या, ठेले, हातगाड्यांवर परप्रांतीयांचा कब्जा असतो. ही बदमाश मंडळी रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृतपणे हक्काने बसून आपला व्यवसाय, धंदे करत असल्याचे दिसते. महावितरणच्या मुख्य कार्यालयाबाहेर एकजण गेल्या अनेक वर्षांपासून तळ ठोकून बसला आहे.         या ठिकाणी सरकारी जागेवर चहा आणि पान, बिडी, सिगारेट, गुटख्याची टपरी थाटून बसलेल्या अज्ञाताने शासन-प्रशासनाला खुले आव्हान दिले आहे. ही जागा मोकळी करण्यात कुणालाही स्वारस्य वाटत नसल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. तर कावेरी चौकात शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेत शाळेच्या बसगाड्या व पालकांची वाहने बेशिस्तीने येत-जात असतात. त्यात कुठेही कशाही तऱ्हेने पार्किंग केल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे नेहमी पहावयास मिळते. परिणामी त्यामुळे रुग्णवाहिका, केडीएमटी बसेस, सामान्य नागरीकांना याचा त्रास सहन करावा लागतो.


           याला अनधिकृत फेरीवाल्यांबरोबरच शाळा प्रशासनही तितकेच जबाबदार असल्याचे दिसते.अनेक ठिकाणी टपऱ्या बांधण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या जागा अनधिकृरीत्या आरक्षित करून गटारे, नाल्यावर कडप्पा टाकून किंवा रेडिमेड टपऱ्या आणून त्यावर बसविण्यात येत आहेत. येथील अनधिकृत फेरीवाले, टपऱ्या यातून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याचे स्पष्ट होत आहे. पोलिस, केडीएमसी, एमआयडीसी प्रशासनाने यावर संयुक्तपणे कडक कारवाई करावी, अशी अपेक्षा या भागातील त्रस्त रहिवासी करत आहेत.

Post a Comment

0 Comments