संत निरंकारी मिशनच्या विविध उपक्रमांचे सुखदेव सिंहजी यांच्या हस्ते उद्घाटन व लोकार्पण

■धर्मार्थ दवाखान्यात ८५ तर नेत्रचिकित्सा शिबिरात १३५ गरजू रुग्ण लाभान्वित


कल्याण : संत निरंकारी मिशनचा समाज कल्याण विभाग आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने रविवारी शहाड येथे मिशनच्या विविध उपक्रमांचे उद्घाटन व लोकार्पण संत निरंकारी मंडळ (दिल्ली)चे महासचिव सुखदेवसिंहजी यांच्याहस्ते करण्यात आले. 


        याप्रसंगी मंडळाच्या वित्त व लेखा विभागाचे व्यवस्थापक विजय बत्रा, पुणे झोनचे क्षेत्रीय प्रभारी ताराचंद करमचंदानी, डोंबिवली झोनचे क्षेत्रीय प्रभारी रावसाहेब हसबे, सेवादल क्षेत्रीय संचालक जनार्दन म्हात्रे, उल्हासनगरचे सेक्टर संयोजक किशनचंद नेनवानी तसेच मिशनच्या आजुबाजुच्या विविध शाखांचे प्रबंधक व सेवादल अधिकारी उपस्थित होते.


      संत निरंकारी सत्संगब भवन, शहाड, उल्हासनगर येथे काही वर्षांपासून चालु असलेल्या धर्मार्थ दवाखान्याचे याच भवनच्या प्रांगणात अन्य ठिकाणी स्थानांतरण व नुतनीकरण करण्यात आले आहे जेणेकरुन त्याचा लाभ आजुबाजुच्या परिसरातील सर्वसामान्य गरजू नागरीक तसेच संत निरंकारी मिशनच्या अनुयायांना होऊ शकेल. 


      या दवाखान्यामध्ये ॲलोपॅथी तसेच होमिओपॅथीचे उपचार गरजू रुग्णांना विनामूल्य प्राप्त करुन दिले जातील. नुतनीकरण करण्यात आलेल्या या धर्मार्थ दवाखान्याचे लोकार्पण २० मार्च रोजी संत निरंकारी मंडळाचे महासचिव सुखदेव सिंह यांच्याहस्ते करण्यात आले. लोकार्पणाच्या दिवशीच याठिकाणी ८५ गरजू रुग्णांनी उपचारांचा लाभ घेतला.


      उल्लेखनीय आहे, की मिशनमार्फत देशभरात १०० पेक्षा अधिक धर्मार्थ दवाखाने चालविण्यात येत आहेत. या व्यतिरिक्त  दिल्ली, आगरा, कोलकाता आणि चेन्नई या शहरांमध्ये धर्मार्थ हॉस्पिटल मिशनमार्फत चालविले जात आहेत.


      संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन आणि रेडक्रॉस सोसायटी, उल्हासनगर यांच्या संयुक्त विद्यमाने संत निरंकारी सत्संग भवन शहाड येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र चिकित्सा शिबिरामध्ये १३५ गरजू रुग्णांनी लाभ घेतला. त्यापैकी ११ व्यक्तींना मोतीबिंदू असल्याचे आढळून आले व त्यांना मोफत शस्त्रक्रिया व उपचारांसाठी इंडियन इंडियन रेडक्रॉस सोसायटी, उल्हासनगर-३ येथे पाठविण्यात येत आहे. या शिबिराचे उद्घाटनदेखील सुखदेव सिंह यांच्याहस्ते करण्यात आले.


  नेत्र चिकित्सा शिबिरामध्ये रेडक्रॉस सोसायटी, उल्हासनगर-३ यांच्या तज्ञ डॉक्टरांच्या टीमने निष्काम भावनेने रुग्णांची तपासणी करुन हे शिबिर यशस्वी करण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावली.


निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज चौकाचे उद्घाटन


     स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन, गोल मैदान, उल्हासनगर याच्या समोरील चौकाचे नामकरण ‘निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज चौक’ असे करण्यात आले असून या चौकाचे सौदर्यीकरणही करण्यात आले आहे. या सुशोभित चौकाचे उद्घाटन चौकाच्या नामफलकाचे अनावरण करुन सुखदेवसिंह यांच्याहस्ते करण्यात आले.


         याप्रसंगी मान्यवरांमध्ये नगरसेवक जमनादास पुरसवानी, समाजसेवक मनोज साधनानी, नगरसेवक राजू जग्यासी, नगरसेविका मीना आयलानी, नगरसेविका गीता साधनानी तसेच विक्की मेघनानी यांचा समावेश होता. मान्यवर व्यक्तींनी निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या प्रति आपल्या श्रद्धा भावना प्रकट करुन त्यांच्या मानवतावादी कार्याची प्रशंसा केली. 


        लोकप्रतिनिधींच्या भावनांचा आदर करत सुखदेवसिंह  यांनी अनेक लोकप्रतिनिधींनी याप्रसंगी बाबाजींच्या प्रति व्यक्त केलेल्या सन्मानजनक भावनांबद्दल त्यांना धन्यवाद दिले तसेच समस्त उल्हासनगरच्या नागरीकांसाठी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

Post a Comment

0 Comments