स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मतपत्रिका वापरा मा. ना. डाॅ.जितेंद्र आव्हाड यांची सूचना


ठाणे ( प्रतिनिधी) -  सध्या जनतेमध्ये ईव्हीएमबाबत संशयाचे वातावरण आहे. त्यामुळे एक प्रयोग म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मतपत्रिकांचा वापर करावा, अशी सूचना गृहनिर्माण मंत्री ना.डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. या संदर्भात मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत आपण प्रस्ताव मांडणार असल्याचेही डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. 


         "अनेक राज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या आहेत. तो राज्यांचा निर्णय असतो. महाराष्ट्रानेही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात" , असे ट्वीट गृहनिर्माण मंत्री ना.डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. या संदर्भात पत्रकारांनी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली. 


       डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, कर्नाटकमध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यात आल्या असल्याचे समजत आहे.  निवडणुका कशा घ्याव्यात, हा निर्णय राज्य सरकारचा असतो.  एकीकडे ईव्हीएमबाबत लोकांच्या मनात शंकाकुशंका निर्माण होत असताना प्रयोग म्हणून का होईना, महाराष्ट्रातील निवडणूका मतपत्रिकेवर घ्याव्यात, असा माझा आग्रह आहे. 


       माझी ही भूमिका मी  आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडणार आहे. राज्याच्या निवडणूका पाहता तो अधिकार राज्याचा असल्याने यावेळेस मतपत्रिकेवर मतदान घ्यावे, असेही ना. डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Post a Comment

0 Comments