ब्रह्मांड नाट्य सिने फॅक्टरीच्या रुपात ब्रह्मांड कट्ट्याचे अभिनय प्रशिक्षण क्षेत्रात दमदार पदार्पण.


ठाणे, प्रतिनिधी  : सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर व कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ ब्रम्हांड कट्टा या संस्थेने अभिनय प्रशिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले आहे. अभिनयावर प्रेम करणा-या कोणत्याही कलाकाराला रंगमंच व मोठा पडदा खुणावत असतो. 


         हाच धागा पकडून अभिनय क्षेत्रात नवनवीन उत्तम कलाकार घडविण्याचे स्वप्न ब्रह्मांड कट्ट्याचे प्रसिद्धि प्रमुख श्री. आनंद खर्डीकर यांनी बाळगले होते जे ब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक राजेश जाधव यांनी सत्यात उतरवण्यासाठी पाठिंबा दिला व अभिनयाचे धडे गिरवण्यासाठी हक्काचे व्यासपीठ व अतिशय स्तुत्य असा उपक्रम साकार झाला तो‌ म्हणजे 'ब्रह्मांड नाट्य-सिने फॅक्टरी' ही संस्था.  या संस्थेच्या विविध उपक्रमातील पहिलं पाऊल म्हणजे बालनाट्य कार्यशाळेचा भव्य असा उद्घाटन सोहळा महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर ब्रह्मांड येथे पार पडला. याप्रसंगी गणेशपूजन करुन शिबीराचा श्रीगणेशा करण्यात आला. 


            उपमहापौर ठाणे शहर मा. सौ. पल्लवी कदम, ठाणे शहर आमदार मा. श्री. संजय केळकर, स्थानिक नगरसेवक श्री. मनोहर डुंबरे, नगरसेवक श्री. संजय तरे , ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक नाटककार अभिनेते व साहित्यिक श्री.अशोक समेळ, सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्री. विजू माने,  प्रसिद्ध पत्रकार अनिल थत्ते, अभिनेता श्री. संतोष वेरुळकर व डॉ. विलास उजवणे, अभिनेत्री आशा ज्ञाते व अंजली उजवणे, उभरती युवा दिग्दर्शिका कु. सिद्धी खर्डीकर अशा सुप्रसिद्ध कलाकार, सामाजिक व राजकिय मान्यवरांनी या सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.


             याप्रसंगी ठाणे महापालिकेच्या मानांकित अशा ठाणे गौरव पुरस्काराने सन्मानित जादुगार मधुगंधा इंद्रजित व ठाणे गुणिजन पुरस्कार प्राप्त युवा दिग्दर्शिका सिद्धि खर्डीकर या ब्रह्मांड कट्टयाच्या सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अध्यक्ष आनंद खर्डीकर व सचिव तसेच मुख्य अभिनय मार्गदर्शक  टी.शांताराम यांच्यासमवेत उपाध्यक्ष संदेश थिगळे, सहसचिव मधुगंधा इंद्रजीत, खजिनदार वंदना गायकवाड ही कार्यकारिणी कार्यरत असेल. 


           तसेच संस्थेचे विशेष सल्लागार म्हणून दिग्दर्शक तुषार गुप्ते, संगीतकार भारत शिंदे, अभिनेत्री राजेश्री गडीकर, अभिनेता प्रकाश सप्रे व समाजसेवक किशोर भोईर या तज्ञांचे सहकार्य लाभणार आहे. उत्तम कलाकार घडविण्यात या संस्थेचा सिंहाचा वाटा असेल व असे समाजोपयोगी उपक्रम सातत्याने ब्रह्मांड कट्टा राबवत राहिल असे प्रतिपादन संस्थापक राजेश जाधव यांनी केले.

Post a Comment

0 Comments