भगतसिंह कोश्यारी यांची राज्यपाल पदा वरुन हकाल पट्टी करण्याची मागणी ओबीसी एकीकरण समितीने दिला आंदोलनाचा इशारा

 


ठाणे (प्रतिनिधी) - छत्रपती शिवाजी महाराज आणि  सावित्रीमाई फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये करणार्‍या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज्यपाल पदावरुन तत्काळ हकालपट्टी करावी, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ओबीसी एकीकरण समितीने दिला आहे. या संदर्भात समितीने जिल्हाधिकार्‍यांमार्फत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन दिले आहे.  


        ओबीसी एकीकरण समितीने दिलेल्या निवेदना नुसार,  मा. उच्च न्यायालयाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे रामदास स्वामी हे गुरु नसल्याचे अधोरेखीत केलेले आहे. असे असतानाही ‘रामदास स्वामी नसते तर शिवाजीला कोणी ओळखले असते’ असे विधान करुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महानतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा सामाजिक स्तर पाहता, त्यातून मराठा समाजाची माथी भडकावून मराठा विरुद्ध ब्राम्हण असा संघर्ष पेटविण्याचा भगतसिंग कोश्यारी यांचा प्रयत्न असल्याची शक्यता असल्याची शक्यता नाकारता येत नाही.  


         दुसरी कडे महिला शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी, “महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीमाई यांचा विवाह लहानपणीच झाला होता. ते एकत्र झोपत तरी असतील का? ही लहान मुले काय करीत असतील?” असे विधान करुन महनिय व्यक्तींच्या खासगी आयुष्यात डोकावून तमाम बहुजनवर्गाच्या मनात संताप निर्माण केला आहे. 


         किंबहुना, ओबीसी समाजाच्या भावना भडकावून त्यांना रस्त्यावर उतरण्यास प्रवृत्त केले आहे. त्यातून दंगे भडकाविण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो, असा आरोप समितीने आपल्या निवेदनात केला आहे. तसेच, शिवरायांबद्दल केलेले विधान हे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याने त्यांच्यावर खटला दाखल करावा, अशीही मागणी समितीने केली आहे.


          या निवेदनावर समितीचे निमंत्रक प्रफुल वाघोले, काँग्रेसचे सरचिटणीस सचिन शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रम खामकर, काँग्रेस ओबीसी सेलचे ठाणे शहर अध्यक्ष  राहुल पिंगळे, शेखर पाटील, , रवींद्र कोळी, अमित पाटील, पप्पू मोमीन,  विक्रम खामकर, सचिन साळवे, संजय भालेराव, निलेश हातणकर अभिषेक पुसाळकर आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Post a Comment

0 Comments