कल्याण बस स्थानकात मराठी भाषा गौरवदिन साजरा


डोंबिवली ( शंकर जाधव )  कल्याण बसस्थानकावर "मराठी भाषा गौरवदिन" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बसस्थानकावरील शिवस्मारकाजवळ जेष्ठ कविवर्य कुसुमाग्रज तथा विष्णू वामन शिरवाडकर (तात्या) यांच्या प्रतिमेचे पूजन कल्याण आगाराच्या पालक अधिकारी तथा यंत्र अभियंता  स्मिता कुलकर्णी यांच्या हस्ते  करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक विजय गायकवाड होते.


          बस स्थानकावर टापरे  यांनी सुंदर रांगोळी रेखाटली होती. बसस्थानकावरील प्रवासी बांधवांना साखरपेढे व गुलाब पुष्प देवून मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छाबदेण्यात आल्या.  याप्रसंगी आगार व्यवस्थापक विजय गायकवाड म्हणाले, मराठी भाषा विविध साहित्यिकांनी व संतांनी समृध्द केली असून संत ज्ञानेश्वरांनी लिहीलेल्या पसायदानाला जगात तोड नाही . छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी राजकोष करवून घेतला व मराठीला राजाश्रय दिला होता. आपण जन्मल्या बरोबर पहीला शब्द उच्चारला तो मराठी होता. 


          भाषा हे फक्त विचार व्यक्त करण्याचे संवादाचे साधन नाही तर तो आपला गर्व आणि अभिमान आहे. मराठी भाषेला थोर साहित्यिकांनी व मराठी मातीत जन्मलेल्या अनेक संत , थोर समाजसुधारक व महात्म्यांनी मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. असे सांगून ज्ञानपीठ विजेते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या विपुल साहित्यातून याची प्रचिती येते. कितीही मोठे संकट आले तरी, त्यातून  "मोडून पडला संसार तरी मोडला नाही 'कणा' " अशा शब्दांत मराठी माणसाचे लढण्याचे नैतिक बळ वाढवणारे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज हे एकमेव श्रेष्ठ साहित्यिक होते.  


          मराठी साहित्य विपुल व समृद्ध आहे, पण "वाटस अप युनिव्हर्सिटी मुळे" वाचनाची आवड कमी होत असल्याची खंत व्यक्त केली.सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक महेश भोये यांनी उपस्थितांचे स्वागत व आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानक प्रमुख  आपोतीकर, वरिष्ठ लिपिक  देवयानी पाटील, मालती , वाहतूक नियंत्रक मणिष म्हात्रे, भोये, सिनकर इत्यादी परिश्रम घेतले. कार्यक्रमास राप कर्मचारी अधिकारी व प्रवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments