सहजानंद चौकात वाहतूक पोलिसांचे नोएंट्री कडे दुर्लक्ष रिक्षांच्या घुसखोरीमुळे होते वाहतूक कोंडी


कल्याण : कल्याण शहरात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौक येथील नोएंट्री कडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करीत असल्याने याठिकाणी रिक्षा आणि इतर वाहनांच्या घूसखोरीमुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते.  तसेच नोएंट्री मध्ये येणाऱ्या वाहनांमुळे अपघात देखील होत असतात.


       कल्याण डोंबिवली शहरांचा समावेश स्मार्ट सिटी झाला असून शहराच्या विकासाच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसरात सॅटिस प्रकल्पाचे काम सुरु असल्याने याठिकाणी वाहतूक पोलिसांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून स्टेशनच्या दिशेने जाणारी एकेरी वाहतूक सुरु ठेवत मार्केट मधून पुष्पराज हॉटेलच्या रस्त्याने मुरबाड रोड दिशने जाणारी एकेरी वाहतूक सुरु ठेवली आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत नाही. हा प्रयोग यशस्वीपणे राबविणाऱ्या कल्याण वाहतूक पोलिसांचे मात्र शहरातील इतर ठिकाणच्या वाहतूक समस्येकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.


       कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौकातून काळा तलाव, बेतूरकर पाडा दिशेने जाणारा रस्ता हा एकेरी असून या ठिकाणी काळा तलाव दिशेने जाणाऱ्या वाहनांना गेल्या कित्येक वर्षांपासून प्रवेश बंदी आहे. मात्र असे असतानाही याठिकाणाहून सर्रासपणे रिक्षाचालक आणि इतर वाहने प्रवेश करत असतात. काळा तलाव कडून येणारा रस्ता हा निमुळता असल्याने दोन्ही दिशेने आलेल्या वाहनांमुळे वाहतूककोंडी होते. तर अनेकवेळा याठिकाणी अपघात देखील घडले आहेत. या ठिकाणापासूनच काही अंतरावर वाहतूक पोलीस आणि ट्राफिक वार्डन उभे असतात मात्र त्यांचे या नोएंट्रीतील वाहनांच्या घूसखोरीकडे दुर्लक्ष होत आहे.


       याठिकाणाहून बेतूरकरपाडा, गोल्डनपार्क, वायले नगर, खडकपाडा याठिकाणी जाणारे रिक्षाचालक इंधनाची बचत व्हावी यासाठी शॉर्टकट मारत आहेत. अशा या बेशिस्त रिक्षाचालकांमुळे दुचाकी आणि इतर वाहने देखील नोएंट्रीमध्ये घुसतात. काही वेळा वाहतूक पोलिसांकडून याठिकाणी कारवाई केली जाते मात्र नंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. त्यामुळे याठिकाणी बेशिस्त रिक्षाचालक आणि इतर वाहनचालकांना वाहतूक पोलिसांनी शिस्त लावण्याची मागणी सामान्य नागरिक करीत आहेत.


       याबाबत कल्याण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश तरडे यांच्याशी संपर्क साधला असता, येथील नोएंट्री बाबत उपाययोजना करून, नियम मोडणाऱ्यांकडून दंड आकारत रिक्षा चालकांचे समुपदेशन करणार असल्याचे  त्यांनी सांगितले. तर याबाबत कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंटॅक्सीघाचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांना विचारले असता रिक्षाचालकांमध्ये वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी जनजागृती करण्यात येईल असे सांगितले.           

Post a Comment

0 Comments