ठाण्यातून सुरु होणार ओबीसी जनजागरण अभियाला सुरुवात रविवारी राष्ट्रवादीच्या वतीने ओबीसी परिषदेचे आयोजन


ठाणे (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यात ओबीसी जनजागरण अभियान सुरु करण्यात येणार आहे. या अभियानाची सुरुवात ठाणे शहरातून होणार आहे. त्या अनुषंगाने येत्या रविवारी (दि. 13) ठाण्यातील टीपटॉप प्लाझा येथे ओबीसी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.


         तर, ज्येष्ठ विचारवंत हरी नरके, राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे आणि समता परिषदेचे बापू भुजबळ हे  उपस्थिताना संबोधित करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस राज राजापूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


        केंद्र सरकारच्या धोरणामुळे इम्पिरिकल डाटाचा घोळ निर्माण झाला असून त्याचा थेट परिणाम ओबीसी समाजघटकांच्या राजकीय आरक्षणावर झाला आहे. त्याबाबत ओबीसींमध्ये जनजागृती करण्यासाठी राज्यभर ओबीसी परिषदांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे ठाणे शहराध्यक्ष गजानन चौधरी हे उपस्थित होते. 


        ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन सद्या देशभर वादळ उठले आहे. ओबीसींना आरक्षण हवे असल्यास त्यांनी संघर्ष करणे गरजेचे आहे. या दृष्टीकोनातून ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये राज्यातील ओबीसी जातसमूहातील 354 पैकी 178 जातसमूहांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. शिक्षण-नोकरी आणि राजकीय आरक्षणाबाबत या परिषदेमध्ये चर्चा करण्यात येणार आहे. 


        तसेच, ओबीसी जात समूहांचे प्रश्न जाणून घेऊन त्या दृष्टीने राज्यभर आंदोलन उभारण्याची पायाभरणी करण्यासाठी ही परिषद दि. 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता आयोजित केली आहे. या परिषदेला गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड हे मुख्य मार्गदर्शन करणार आहेत. तर, ज्येष्ठ विचारवंत हरी नरके, राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे आणि समता परिषदेचे बापू भुजबळ  हे उपस्थितांना संबोधित करणार असून राज्यभरातील सुमारे 500 ओबीसी प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत,  असे राज राजापूरकर यांनी सांगितले. 


          ठाण्यातील ओबीसी परिषदेप्रमाणेच राज्याच्या इतर भागातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या वतीने ओबीसी मेळावे आयोजित करण्यात येणार असून ठाण्यातून ही सुरुवात होणार आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील सर्व ओबीसी जात समूहांच्या प्रतिनिधींनी ओबीसी परिषदेमध्ये उपस्थिती दर्शवून आपले प्रश्न मांडावेत, असे आवाहन आनंद परांजपे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments