आशाताईं'चा सन्मान कल्याण पंचायत समितीने साजरा केला आशा दिवस


ठाणे दि.१९ (जि.प)  :  गावाचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आरोग्य विभागाचा भाग म्हणून अहोरात्र कार्यरत असणाऱ्या 'आशाताईं'चा सन्मान करण्यात आला. आशा दिवसाचे औचित्य साधत कल्याण पंचायत समितीच्या वतीने शुक्रवारी हा सन्मान सोहळा जीवन दीप महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला.


          यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, गट विकास अधिकारी अशोक भवारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भारत मसाळ,  जिल्हा परिषद सदस्या जयश्री सासे , वृषाली शेवाळे तसेच पंचायत समिती सदस्या अस्मिता जाधव , रेशमा भोईर ,  रमेश बांगर , यशवंत दळवी, जीवनदीप महाविद्यालयाचे प्रमुख रविंद्र घोडविंदे उपस्थित होते . 


            कोविड महामारीत रुग्णसंख्या आटोक्यात येण्या करीता आशा कार्यकर्ती यांनी प्रशासनास मोलाचे सहकार्य केले. रुग्ण सर्वेक्षण करणे, कोविड लसीकरण मोहिमेत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. समाजातील शेवटच्या थरापर्यंत पोहोचून त्यांना आरोग्य सेवा देण्याचे काम आशा कार्यकर्ती नेहमीच करत आहेत. त्यामुळे समाज व प्रशासनातील अत्यंत महत्वाचा दुवा म्हणून आशाताईंचे काम कौतुकास्पद असल्याच्या भावना व्यासपीठावरील मान्यवरांनी व्यक्त केल्या. 


 स्पर्धा आणि विजयीत्सव


          यावेळी कल्याण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र दहागाव , निळजे व खडवली येथील आशा कार्यकर्ती यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून कार्यक्रमस्थळी उपस्थित होत्या. आशा कार्यकर्ती यांचेमधील सुप्त गुणांना वाव मिळण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमात आशा कार्यकर्तीसाठी पथनाटय , सामूहिक व वैयक्तिक नृत्य तसेच गायन, संगीत खुर्ची , प्रश्नमंजुषा इ .स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. 


          यावेळी घेण्यात आलेल्या पथनाटय प्रकारात प्रा.आ. केंद्र खडवली येथील आशा कार्यकर्ती यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर वैयक्तिक स्पर्धेमध्ये  प्रा.आ.केंद्र निळजेच्या पुष्पा पाटील, यांनी अभंग सादर करून प्रथम क्रमांक मिळवला. दहागावच्या पुजा नवनाथ भोईर यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. संगीत खुर्ची खेळामध्ये रेशमा साळवे यांनी प्रथम तर निशा राणे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्राथमिक आरोग्य केंद्र दहागाव यांनी बाजी मारली .

Post a Comment

0 Comments