आठवलेंनी पँथरची काळजी करू नये - मल्लिकाताई ढसाळ


ठाणे, प्रतिनिधी  :  नामदेव ढसाळ यांनी दलित पँथरची स्थापना केली असतानाही त्यांच्या सोबत असलेल्यांनी त्यांच्यावर संघटनेच्या संरक्षण मंत्र्याची जबाबदारी दिली होती. त्यामुळे जिथे जिथे अन्याय अत्याचार होत होता, तिथे तिथे नामदेव ढसाळ जीव धोक्यात घालून लढायला जात होते. त्यांच्या सोबत असणारे मात्र घरात बसून कपडे सांभाळण्याचे काम करीत होते आणि आता या लोकांना दलित पँथर पुढे न्यायची आहे म्हणे. मात्र ढसाळांसोबत लढायचे सोडून त्यावेळी घरात बसलेल्यांना आता दलित पँथरचा एवढा पुळका का आलाय? 


       तर आता यांच्यासोबत कोणीही राहिले नाही, समाजात त्यांची पत राहिलेली नाही. म्हणून आता यांना केवळ स्वतः च्या स्वार्थासाठी दलित पँथर हवी आहे. पण आपण ते होऊ देणार नाही. नामदेव ढसाळ यांनी स्थापन केलेली दलित पँथर फक्त आम्हीच चालवू. ती जबाबदारी आता रामभाऊ तायडे यांच्या खांद्यावर दिली असून ते ती सक्षमपणे पार पाडण्यास सक्षम आहेत, आठवले आणि इतरांनी त्याची काळजी करू नये. असे रोखठोक प्रतिपादन दलित पँथरच्या श्रेष्ठी तथा नामदेव ढसाळ यांच्या पत्नी लेखिका मल्लिकाताई ढसाळ यांनी केले. 


       नामदेव ढसाळ यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी त्या ठाण्यात उपस्थित झाल्या होत्या. त्यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या प्रसंगी दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष रामभाऊ तायडे, केंद्रीय कमिटीचे जनार्दन घायमुक्ते, स्वामी पिल्ले, शंकर बुकाणे, महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. रोहित पिसाळ आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. तर राष्ट्रीय अध्यक्ष रामभाऊ तायडे यांनीही गटतट निर्माण करणाऱ्या रिपब्लिकन पुढाऱ्यांचा समाचार घेतला. 


       ज्यांनी नामदेव ढसाळांशी गद्दारी केली, त्यांना यातना दिल्या, एकटे पाडण्याचा प्रयत्न केला, तेच गद्दार आज दलित पँथर पुनर्जीवित करू असे म्हणताहेत. जर अशांना पँथर वाढवायची होती, तिची काळजी घ्यायची होती तर यांनी आपापली वेगळी चूल मांडून समाजाला प्रस्तापित पक्षांच्या दावणीला का बांधले? असा सवाल उपस्थित करीत पँथर अशा गद्दारांना कधीच माफ करणार नाहीत, असा हल्ला दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष रामभाऊ तायडे यांनी चढविला. दलित पँथरच्या वतीने नामदेव ढसाळ यांची १५ फेब्रुवारी रोजी ठाण्यात जयंती साजरी करण्यात आली. 


        त्यावेळी संघटनेची भूमिका विषद करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्यात तायडे बोलत होते. आगामी ९ जुलै रोजी दलित पँथर संघटनेचा ५० वा वर्धापनदिन आहे. हा वर्धापनदिन दलित पँथर देशभरात साजरा करणार आहे. मुंबईतही हा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जाईल. असे सांगतानाच ढसाळ यांच्या दलित पँथरचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याची घोषणा काही गटातटाचे केली आहे. त्यांना दलित पँथरचे सांगणे आहे की, नामदेव ढसाळ यांच्या दलित पँथरचा नक्कीच गवगवा करा, पण तुमच्या नियतीत खोट असल्याने तुम्ही पँथर म्हणवून घेण्यास पात्र नाहीत असेही तायडे पत्रकारांनी बोलताना म्हणाले. 


      यावेळी दलित पँथरच्या श्रेष्ठी आणि थोर लेखिका मल्लिकाताई ढसाळ, दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष रामभाऊ तायडे, महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. रोहित पिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर चित्रपट देखील काढला जाणार असल्याचे घोषित करण्यात आले. तसेच पत्रकार परिषदेनंतर ढसाळ यांच्या जयंतीच्या निमित्ताने एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्येही उपस्थितांना मार्गदर्शन करताना रामभाऊ तायडे यांनी प्रस्थापित व्यवस्था व विविध गटतट निर्माण करून समाजाला जातीयवादी पक्षाशी बांधणाऱ्या नेत्यांचा तायडे यांनी चांगलाच समाचार घेतला. 


       आगामी वर्षभरात दलित पँथर देशभरात नेऊन महाराष्ट्रात घरघरात पोहोचविली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर मल्लिकाताई यांनी 'नामदेवसाठी' नामक स्वलिखित तीन कवितांचे उपस्थितांसमोर वाचन केले. तर नामदेव ढसाळांना साश्रू नयनांनी अभिवादन केले. यावेळी अनेक मान्यवर मंचकावर संघटना श्रेष्ठी मल्लिकाताई ढसाळ, राष्ट्रीय अध्यक्ष रामभाऊ तायडे, जनार्दन घायमुक्ते, महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. रोहित पिसाळ, पत्रकार पाईकराव, ॲड लांडगे, शंकर बुकाणे, अशोक बनसोडे, स्वामी पिल्ले, संतोष भोईर, रवी हिरवे, सुंदर पिल्ले आदी मान्यवर उपस्थित होते.


         त्यांनीही नामदेव ढसाळ यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी राष्ट्रीय अध्यक्षांच्या हस्ते विविध पदांवर अनेकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या प्रसंगी महाराष्ट्र महिला उपाध्यक्षा विमलताई शरणागत, सम्राट संगारे, ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा सुरेखाताई गायकवाड, महाराष्ट्र सह संघटक महादेव नाटेकर, ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष रमेश पगारे, ठाणे शहर युवक अध्यक्ष जयेश बनसोडे, ठाणे जिल्हा महिला उप अध्यक्ष कविताताई मगरे, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष सीमाताई खरे, ठाणे जिल्हा महिला संघटक सुप्रियाताई तांबे, सुशीला गायकवाड, सविता रणपिसे, मदिना मोमीन खान, शारदा चंदनशिवे, पुणे महिला अध्यक्ष सोनालीताई दुनघव, ठाणे जिल्हा महिला सल्लागार तुळसाबाई मोरे, रायगड शहर अध्यक्ष स्नेहा भोसले, कोपरी पाच पाखाडी विधानसभा युवक अध्यक्ष करण भंडारे, पनवेल शहर महिला अध्यक्ष सुरेखा घोडके, पुणे महिला उप अध्यक्ष करोना खलोले आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments