ब्रह्मांड कट्टयावर प्राणि प्रेमींसाठी उपयुक्त मार्गदर्शन शिबिर.


ठाणे , प्रतिनिधी : सामाजिक व सांस्कृतिक कार्यात अग्रेसर ब्रह्मांड कट्टा हा प्रत्येक स्तरातील लोकांसाठी कार्यरत असतो. याच मौलिक सेवेत एक पाऊल पुढे टाकत ब्रह्मांड कट्टा अंतर्गत ब्रह्मांड मॉर्निंग इव्हनिंग वॉकर्स क्लब या संस्थेने प्राणिप्रेमींसाठी खास मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते.


          या शिबिरात ज्येष्ठ पशूवैद्य डॉ. शिरीष देशपांडे व जोशीबाग अर्बन कॅम्पिंगच्या संचालिका धनश्री जोशी यांनी विविध विषयांवर प्राणिप्रेमींशी संवाद साधून मार्गदर्शन केले. विशेष गोष्ट म्हणजे अनेक पाळीव पशूंनीदेखील आपल्या मालकांसमवेत या शिबीरास डौलात हजेरी लावत शोभा आणली. 


          डॉ. देशपांडे यांनी पाळीव प्राण्यांचे आरोग्य व आहार यांची सखोल माहिती देत विविध समस्या व  उपाययोजनांचे विवेचन केले. पशूंच्या अनेक आजारांवर प्रकाशझोत टाकत त्यावरील साधे सोपे उपाय सुचवले. निरोगी आयुष्यासाठी माणसांप्रमाणेच प्राण्यांसाठीही विहार म्हणजे आउटींग महत्वाचे आहे. कुटुंबासमवेत फिरण्याच्या आनंदावर त्यांचाही हक्क असतो. 


         हाच धागा पकडत श्वानांसाठी खेळण्याची जागा, स्विमिंग पूल, ट्रेकिंग, जंगल सफर, कॅम्पिंग या विविध सोयीसुविधा असलेल्या जोशीबाग अर्बन कॅम्पिंगबद्दल संचालिका धनश्री यांनी मनोरंजक तसेच उपयुक्त माहिती दिली. डॉ. देशपांडे व धनश्री यांनी लोकांच्या शंकांचे निरसन केले. देशपांडे यांच्या डॉ. डी क्लिनिक तर्फे सहभागी सदस्यांना पशूमित्रांसाठी गिफ्ट हॅम्पर्स देण्यात आले. 


      ब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक श्री. राजेश जाधव यांनी दोन्ही तज्ञ पाहुण्यांचे आभार मानत मानवकल्याणाप्रमाणेच प्राणिमात्रांप्रति दयाभावाचे महत्व‌ विशद केले. प्राणी हे आपले मित्र असून आपण अत्यंत आत्मियतेने त्यांचे संगोपन करणे आवश्यक आहे. त्यामुळे सामाजिक भान ठेवत आयोजित केलेल्या या अभ्यासपूर्ण शिबिराला प्राणिप्रेमींनी सक्रिय सहभाग घेऊन दाद दिली.

Post a Comment

0 Comments