मंडल आयोगाची दुसरी लढाई सुरु होणार ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा एल्गार

■महाराष्ट्रातील ओबीसींनी आपली ताकद ओळखावी 50 टक्क्यांची मर्यादा कशासाठी? कामाठीपुर्‍याचा विकास करणारच...

ठाणे (प्रतिनिधी) -  या देशात वाघ, सिंह, बकरे, कुत्रे, मांजराची गणना होते. पण, माणसातील वाघांची म्हणजे ओबीसींची जातगणना केली जात नाही. शिवरायांच्या सैन्यात सर्वाधिक ओबीसीच होते. पण, हा लढणारा ओबीसी आता शांत आहे. त्यामुळेच ‘त्या’ लोकांना असे वाटते की या ओबीसींनाच जात नकोय; पण, आता शांतपणे पाहण्याची वेळ गेली आहे. शिक्षणातील आरक्षण संपणार असल्यानेच माझा जीव तुटतोय; म्हणून आता मंडल आयोगाची दुसरी लढाई सुरु करावीच लागेल, असा एल्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पुकारला.  

 

        ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यस्तरीय ओबीसी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष इश्वर बाळबुधे,  राष्ट्रवादीचे ठाणे शहाराध्यक्ष आनंद परांजपे, ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस राज राजापूरकर, शहराध्यक्ष गजानन चौधरी आदी उपस्थित होते.  यावेळी ना. डॉ.  आव्हाड यांनी स्टेजवर खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी घेऊन चक्क ढोल वाजवित मंचावर प्रवेश केला. 


           ना. डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले की,  मंडल आयोगामुळे तुमच्यातील महापौर निर्माण झाला. सोलापुरात कलाल समाजाची पहिली महापौर झाली ते मंडल आयोगामुळेच! कलाल समाजाबद्दल किती लोकांना माहित आहे, कलाल हा  हा दारु विकणारा समाज आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पिछडा अन् अतिपिछडा वर्ग आहे. त्यांना आपल्या अधिकाराची जाणीव आहे. मात्र, महाराष्ट्रात जातीबाबत ओळख नाही. हे दुर्देव आहे.  तुम्हाला गप्प बसून आरक्षण मिळणार नाही. 


           त्यासाठी जोरात ओरडावे लागेल; आपणे अधिकार लढून मिळतात, शांत बसून नाही.  आपल्यालाही लढाई निकराने लढावी लागेल. त्यासाठी बेंबीच्या देठापासून ओरडावे लागेल, असे सांगतानाच आरक्षण हा काही दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. शोषित आणि वंचितांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी आरक्षण दिले गेले आहे. शोषित लोकांना आरक्षण मिळाले पाहिजे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनी सांगितले आहे.प्राणीमात्रांची गणना होते. मात्र, ओबीसींची जनगणना का होत नाही? असा सवालही त्यांनी केला.


            महाराष्ट्रात ओबीसींमध्ये 354 जाती आहेत. मी स्वतःच ओबीसी आहे. पण, मी कधीच ओबीसींचे राजकारण केले नाही. पण आपल्या बांधवांसाठी मला लढावे लागणार आहे. महाराष्ट्रात डोक्यावर छप्पर नाही असा सर्वाधिक समाज हा आदिवासी आणि भटका आहे. पण आपण मागासवर्गीय आहे हे सांगायची काहींना लाज वाटते.  


          शहरीकरण झाले असले तरीही 100 ओबीसी मुलांपैकी फक्त 8 जण पदवीधर होत आहेत. ओबीसींमध्ये शाळा सोडण्याचे प्रमाण वाढले आहे. अशात ओबीसींना शैक्षणिक आरक्षणाची गरज आहे. सरकारी नोकर्‍यांमध्ये आरक्षण असले तरी सरकारी नोकर्‍या आहेत कुठे, सरकारी मालकीचे उद्योगांची तर विक्रीच झालेली आहे. अन्  ज्या संघटनेने संविधानाला विरोध केला आहे. ते लोक तुमच्या आरक्षणाला पाठिंबा कसा देणार? ओबीसी समाज पुढे जात असल्याने काही लोकांच्या डोळ्यात खूपत आहे. 


        घर काम करणार्‍या मातेचा मुलगा इंजीनियर होतो. हे आता काही लोकांना खूपत आहे. आपल्या घरातील धुणीभांडी करणार्‍या बाईचा मुलगा शिक्षण घेऊन जर परदेशात जाणार असेल तर काही लोकांच्या पोटात दुखणारच ना, त्यातूनच या लोकांचा ओबीसी आरक्षणाला विरोध आहे.  असे सांगतानाच डॉ. आव्हाड यांनी,  तुमच्या घरात आणि देवघरात महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावा. 


        कारण, त्यांच्यामुळेच आपण मुख्य प्रवाहात आलो आहोत,  असे आवाहनही त्यांनी केले. ओबीसींना आपली ताकद समजलेलीच नाही. त्यामुळे आरक्षण विरोधक आपणाला गृहीत धरतात. त्यासाठी ओबीसींनी एक व्हायला पाहिजे. या देशाचे राजकारण आपल्या बोटांवर नाचले पाहिजे. उत्तर प्रदेश-बिहारमध्ये जर ओबीसी आपला मुख्यमंत्री ठरवित असतील तर महाराष्ट्रातील ओबीसींनीही आपली ताकद ओळखावी, असेही डॉ. आव्हाड यांनी म्हटले. 

 

         यावेळी त्यांनी हिजाबच्या मुद्यावरूनही केंद्र सरकारला इशारा दिला. ‘हिजाब’ तो सुरुवात है ‘किताब’ अभी बाकी है, असा इशारा काही लोकांनी दिला आहे. श्रीराम सेनेच्या प्रमोद मुतालिक यानेच हिंदू मुलींनी जिन्स आणि स्कर्ट घातले म्हणून त्यांना मारहाण केली होती. आमच्या मुलींनी स्कर्ट घालायचे नाही; हिजाब घालायचा नाही, हे श्रीराम सेना ठरवणार का? आता मोदींच्या मिनिस्ट्रीत ड्रेस कोड ठरवला पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.

 

           यावेळी, ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी करुन ओबीसींचे आरक्षण कशा रितीने मोदी-फडणवीस यांनी संपविण्ययाचा प्रयत्न केला, हे सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आरक्षणमुक्त भारत हा अजेंडा चालविण्यात येत आहे. त्यासाठीच आरएसएसने जाहीर पत्रक काडून तसेच, मोहन भागवत यांनी जाहीर भाषणात आरक्षणाची गरज नसल्याचे प्रतिपादन केले आहे. 


          सुमारे 5 हाजर कोटी रुपये खर्च करुन मिळविलेली ओबीसींची आकडेवारी मोदी सरकारने लपवून ठेवली आहे. मोदी सरकारने संसदेत ही आकडेवारी योग्य तर कोर्टात ही आकडेवारी अयोग्य असल्याचे सांगितले आहे. 


           एवढे दुतोंडी सरकार प्रथमच देशात आले आहे. हे लोक ओबीसींचा बुद्धीभेद करीत आहेत. ओबीसींच्या वाट्याचा निधी उच्च जातीतील आर्थिक दृष्ट्या गरीबांना देण्याचा कट आहे. या गरीबांना निधी देण्यास आमचा विरोध नाही. पण, त्यांनी त्यासाठी ओबीसींच्या निधीवर का डल्ला मारावा?


          असा सवाल करुन दरवर्षाला दरडोई फक्त 18 रुपये ओबीसींसाठी राखीव ठेवले आहेत, असेही नरके यांनी सांगितले.  या पुढे जात म्हणून न लढता ओबीसी म्हणून एकत्रित लढावे लागणार आहे. कारण, केंद्रातील सत्ताधारी लोक खोटे बोलण्यात पारंगत आहेत. त्यासाठी लढाई लढलीच पाहिजे. ही लढाई लढली तरच ओबीसींचा सूर्य उगवेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. 


           दरम्यान, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस राज राजापूरकर यांनी केले. यावेळी त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल त्यांचे आभार मानले. या शिबिरासाठी राज्यभरातील विविध जातींचे सुमारे 500 प्रतिनिधी उपस्थित होते. 


■50 टक्क्यांची मर्यादा कशासाठी?


          50 टक्क्यांची मर्यादा ही कोणाच्या सुपीक डोक्यातून आलेली आहे. हे मला तरी आजपर्यंत समजलेले नाही. जनगणनेशिवाय आकडेवारी कळत नसल्याने तुम्ही टक्केवारी तरी कशी ठरवणार? त्यामुळे येथील सामाजिक व्यवस्थेत मागे असलेल्या जातींना मागेच ठेवण्याचे काम या 50 टक्क्याच्या मर्यादेमुळे झालेले आहे.


             त्यासाठी जातगणना करा; म्हणजे, जेवढी ज्यांची लोकसंख्या तेवढा त्यांना हिस्सा मिळेल. आज 50 टक्क्यांची  मर्यादा आपण काढून टाकली तर मागासलेल्या मराठा बांधवांना देखील आरक्षण देता येतील आणि ते न्याय्य ठरेल. त्यांनी आपापसात भांडावे आणि लढत रहावे, याच साठीच 50 टक्क्यांची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे, असेही ना. डॉ. आव्हाड यांनी म्हटले.  


■कामाठीपुर्‍याचा विकास करणारच!


          कामाठीपुर्‍याचा विकास करणार असल्याची घोषणा डॉ. आव्हाड यांनी यावेळी केली. येत्या महिन्यात कामाठीपुर्‍याचा विकास करणार आहोत. कामाठीपुरा हा ऐतिहासिक आहे. कामाठी लोक मुंबईत आले आणि ते या परिसरात कष्ट करण्यासाठी थांबले. त्यांच्यामुळेच सात बेटांची मुंबई एक झाली. त्यामुळे या परिसराला कामाठीपुरा म्हणतात. 


            आज आरक्षण गेल्यामुळे त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाची गैरसोय होणार आहे.  आजही हे लोक दहा बाय दहाच्या घरात राहतात. मी तिथे गेलो होतो. तिथे एकाकडे जेवलो. जेवण अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे होते. गरीबी काय असते हे मी पाहिले आहे. त्यामुळेच मी गरीबांसाठी काम करणार आहे. देवानेही माझ्या हातून हे सत्कार्य घडवून येऊ द्यावे, असेही ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments