वेंगुर्ल्याच्या धर्तीवर ग्रामीण भागात सांडपाणी घनकचऱ्याचे प्रकल्प राबविणार – जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील

■जिल्हा परिषद पदाधिकारी आणि अधिकारी यांनी दिली प्रकल्पांना भेट


ठाणे दि. २८ ( जि.प) :  सिंधुदूर्ग जिल्हातील वेंगुर्ला नगरपरिषदेने सांडपाणी-घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत राबविलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रम ठाणे जिल्हाच्या ग्रामीण भागात राबवून येथील सांडपाणी  घनकचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील दिली. नुकतेच जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या स्वच्छ भारत मिशन ( ग्रा) अंतर्गत  वेंगुर्ला येथे अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते.


            वेंगुर्ला नगरपरिषदेने सांडपाणी - घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत केलेल्या कामाची  जागतिक स्तरावरही नोंद घेण्यात आलेली आहे. त्यामुळे वेंगुर्ला नगरपरिषद राबवत असलेले प्रकल्प ग्रामीण भागात राबण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्रयत्न करणार आहे.  


        या प्रकल्पांची ओळख होण्याच्या दृष्टीने  जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार, कृषि सभापती संजय निमसे, महिला व बाल कल्याण सभापती श्रेया गायकर, अंबरनाथ पंचायत समिती सभापती अनिता निरगुडा, कल्याण पंचायत समिती सभापती अनिता वाघचौरे, शहापूर पंचायत समिती सभापती यशोदा आवटे, मुरबाड पंचायत समिती सभापती प्रतिभा खापरे, जल व्यवस्थापन समिती सदस्य सुवर्णा राऊत, जयश्री सासे, ग्रामपंचायतचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, पाणी पुरवठा विभागाचे प्रकल्प संचालक दादाभाऊ गुंजाळ तसेच विविध पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, स्वच्छ भारत मिशनचे अधिकारी यांनी  वेंगुर्ला नगरपरिषदेच्या प्रकल्पांना भेट दिली. 


              यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.अमित कुमार सोंडगे आणि कनिष्ट अभियंता यांत्रिकी व पर्यावरण   सचिन काकड यांनी कचरा वर्गीकरण, कचरा संकलन, शास्त्रीय शुद्ध पद्धतीने विल्हेवाट प्रक्रिया, ओला कचऱ्यापासून वीजनिर्मिती व खत निर्मिती प्रकल्प, ओला कचऱ्यापासून वीजनिर्मितीसाठी जैव पद्धतीचा प्रकल्प, गांडूळ खत प्रकल्प निर्मिती, सुका कचऱ्यावर पुनरप्रक्रिया, पालापाचोळा पासून कांडी कोळसा निर्मिती, मैला प्रकल्प आदि प्रकल्पांची प्रत्येक्षस्थळी माहिती दिली. 


           दरम्यान अभ्यास गटाने नगरपरिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या  विविध वास्तूंना, आणि कलाप्रदर्शन संकुलाला भेट देत  दिली. यावेळी वेंगुर्ला नगरपरिषदेने जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि अधिकारी यांचा यथोचित सन्मान केला.

Post a Comment

0 Comments