ठाणे, प्रतिनिधी : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील मुंब्रा शिळ डायघर पोलीस स्टेशनमध्ये दोन वेगवेगळे गुन्हे दाखल असून यामध्ये ठाणे महानगरपालिकेचे कंत्राटी व सुरक्षा बोर्डातर्फे महापालिकेच्या सेवेत नेमलेल्या सुरक्षा रक्षक, खाजगी लिपिक व इतर पाच आरोपी अटक झाले असून या गुन्ह्य़ाबाबतची चौकशी सी.आय्.डी.मार्फत करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा.ना.दिलिप वळसे-पाटील यांनी दिले असल्याची माहीती शहर काॅग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण यांनी दिली.
सदरहू प्रकरणात महानगरपालिकेच्या अधिका-यांची व काही लोकप्रतिनिधींची चौकशी सी.आय्.डी.मार्फत करावी अशी मागणी राज्याचे गृहमंत्री मा.ना.दिलिप वळसे-पाटील यांच्या कडे शहर काॅग्रेसच्या वतीने पत्रकाद्वारे करण्यात आली होती या पत्रात सदर प्रकरणात राजकीय दबाव व हस्तक्षेपामुळे ठाणे पोलीस हतबल असून,सदर गुन्हयांचा तपास योग्य रितीने होत असताना दिसत नसल्याचे निदर्शनास आणून दिले असता या पत्रावरच गृहमंत्री वळसे-पाटील यांनी संबधित अधिका-यांना सी.आयडी चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
ठाणे शहर काॅग्रेसच्या वतीने आज एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेला शहर काॅग्रेस सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे,महेंद्र म्हात्रे,गिरीश कोळी,नितीन घोलप,राहुल पिंगळे,प्रसाद पाटील आदि पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी बोलताना विक्रांत चव्हाण यांनी सागितले की,या गुन्हयांचे स्वरुपा पाहता यामध्ये ठाणे मनपा अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या सहभागाशिवाय हे गुन्हे घडू शकत नाहीत असे प्रथमदर्शनी दिसून येत होते,साक्षीदार व अटक झालेले आरोपी यांच्याही जबानीतून ही बाब पुढे आलेली आहे.
या गुन्हयामध्ये योग्य तपास न झाल्यास व दोषींवर कारवाई न झाल्यास सामान्य गरजू जनतेला शासनाकडून मिळणारी मोफत घरे या तत्वालाच हरताळ फासला जाईल म्हणूनच आम्ही हि मागणी लावून धरली होती,गुन्हयांचा तपास अधिक पारदर्शक होणेकरीता तातडीने राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्याचे आदेश पारित करावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना काँग्रेस ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली होती.
0 Comments