६०व्या हिरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटयस्पर्धेचे कल्याणात उद्घाटन


कल्याण ( शंकर जाधव ) कल्याणच्या आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात महाराष्ट्र शासनाच्या ६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२१-२२ चे उद्घाटन झाले. नाट्य स्पर्धा सोमवार २१ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या अठरा केंद्रावर  एकाच वेळी सुरू झाली.


          महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री  अमित देशमुख, महसूलमंत्री  बाळासाहेब थोरात यांनी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे  स्पर्धेचे प्रथमच ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करून रंगकर्मींना शुभेच्छा दिल्या.या स्पर्धेत एकूण १४ नाटके सादर होणार आहेत. 


          उद्घाटन सोहळ्याची प्रत्यक्ष चित्रफीत आचार्य अत्रे रंगमंदिरात दाखवण्यात आली. यावेळी केंद्रातही  स्थानिक कलावंत, नाट्यरसिक व मान्यवर  उपस्थितीत होते. प्रवेशदारात  कोंडाजी बोडके यांच्या जागरण गोंधळ पार्टीने संबळ वाजवून व गाणी म्हणून सोवळ्याची रंगत वाढवली. 


         नंतर रंगमंदिरात प्रमुख पाहुण्या अभिनेत्री तथा लेखिका  मेघना साने, परिक्षक भालचंद्र कुबल, सुजाता गोडसे, सुधाकर गीते अत्रे रंगमंदीरचे व्यवस्थापक माणिक शिंदे, नाट्यपरिषद कल्याण शाखेचे अध्यक्ष व स्पर्धा समन्वयक  शिवाजी शिंदे, उपाध्यक्षा प्रीती बोरकर, यांनी दिपप्रज्वलन व नटराज पुजन करून स्पर्धेचे उदघाटन केले. 


         शिवाजी शिंदे व रवींद्र सावंत यांनी पुस्तक व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत केले. शिवाजी शिंदे व प्रीती बोरकर यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुण्या मेघना साने यांनी काही स्वानुभव सांगून स्पर्धकांना प्रोत्साहित केले व उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.  त्यानंतर अभिनय कल्याण या संस्थेचे 'समतोल' हे नाटक सुरू होण्यापूर्वी कोंडाजी बोडके यांनी देवीचे गाणे म्हंटले व स्पर्धेची सुरुवात झाली. 


        कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी  अनिल ठाणगे, संजय गावडे, स्वप्नील चांदेकर, हेमंत यादगिरे, करुणा कातखेड, सुजाता कांबळे-डांगे, ऐश्वर्या भरगुडे, मेघा शिंदे, विशाल पितळे, विशाल केंबुळकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास सोनावणे यांनी केले.

Post a Comment

0 Comments