अंतिम टप्प्यातील बी. जे. हायस्कूलच्या कामाची खासदार राजन विचारें कडून पाहणी- येत्या १५ दिवसात बी. जे. हायस्कूलचे लोकार्पण...


ठाणे , प्रतिनिधी :-  ठाणे शहराच्या मध्यभागी असलेल्या टेंभीनाका येथील उभी राहत असलेल्या बी जे हायस्कूलच्या इमारतीच्या अंतिम टप्प्यातील बांधकामाची पाहणी ठाण्याचे खासदार राजन  विचारे यांनी केली. या पाहणी दोऱ्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे,  नगरसेवक सुधीर कोकाटे उपस्थित होते.


       टेंभी नाका ठाणे  येथील १५० वर्षाची परंपरा असलेल्या बी. जे. हायस्कूलच्या इमारतीचे बांधकाम सन १८७२ मध्ये केलेले होते. मूळ इंग्लिश स्कुल असलेली ही शाळा १४ ऑगस्ट १८८० मध्ये सर बैरामजी जीजीभाय ट्रस्ट ने राहते घर जमीन रुपये ८,५००/- ला शाळेसाठी दानपत्र करून शासनासाठी अर्पण केली होती. म्हणून या शाळेचे नाव बैरामजी जीजीभाय ठाणा हायस्कूल (बी जे हायस्कूल) करण्यात आले.


      या शाळेमध्ये बाळ गंगाधर टिळक, आचार्य श्री. भिसे, आचार्य श्री. दोंदे, स्वातंत्र्य सेनानी श्री. दत्ताजी ताम्हाणे व श्री. कृष्णाजी दामले, मुंबई राज्याचे पहिले अर्थमंत्री श्री. गोविंदराव प्रधान, क्रिकेटपटू श्री. खंडू रांगणेकर, ज्येष्ठ विधीतज्ञ श्री. माधवराव हेगडे, व श्री. प्रभाकर हेगडे, माजी आमदार श्रीमती. विमलताई रांगणेकर, व श्रीमती. कावेरीताई पाटील, श्रीमती. चंपुताई मोकल, श्रीमती. कुसुमताई शालीग्राम, सारस्वतकार श्री. वि. ल. भावे, श्री. वामराव रेगे, उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश श्री. दिघे, माजी महापौर श्री. मोहन गुप्ते, श्री. अशोक राउळ, श्री. मनोहर गाढवे, ज्येष्ठ वकील श्री. रमाकांत ओवळेकर, डॉ. श्री बाबा कारखानीस, डॉ. श्री. प्रभाकर भागवत, डॉ. श्री. हजरनीस, प्रसिद्ध क्रिकेट समीक्षक श्री. सुधीर वैद्य, श्री. विजय दप्तरदार प्रध्यापक श्री दाउद दळवी, अशा थोर व्यक्तींनी शिक्षण या शाळेत घेतलेला इतिहास आहे.


         सन १९८४ साली शाळा धोकादायक झाल्याने ही इमारत पाडण्यात आली. तेव्हापासून या कामाला निधीची तरतूद मिळत नसल्याने काम रखडले होते. खासदार राजन विचारे यांनी आमदार असताना अधिवेशनामध्ये याचा पाठपुरावा करून शासनाकडून १४ कोटी ३५ लाख  निधी उपलब्ध करून काम सुरू करून घेतले. 


         त्याचे भूमिपूजन खासदार झाल्यानंतर २१ डिसेंबर २०१४ रोजी करण्यात आले होते. त्यावेळी या इमारतीच्या बांधकामाला लागणाऱ्या सर्व परवानग्या महापालिकेकडून खासदार राजन विचारे यांनी मिळवून दिल्या. परंतु मधल्या काळात वास्तुविशारद व ठेकेदार यांच्या आडमुठेपणामुळे हे काम वेळेत पूर्ण झाले नाही.


         या पाहणी दौऱ्यात खासदार राजन विचारे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे यांना नव्याने झालेल्या इमारतींमध्ये अत्याधुनिक पद्धतीची बेंचस, डिजिटल बोर्ड व इतर लागणाऱ्या सुविधांचा समावेश तात्काळ करून घ्या येत्या १५ दिवसात या इमारतीचे आपण लोकार्पण करू असे खासदारांकडून सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments