भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी करणार राष्ट्रवादीच्या सर्व जिल्हाध्यक्षांनी घेतला निर्णय

भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी गरजेची- ना. डॉ. जितेंद्र आव्हाड...


ठाणे (प्रतिनिधी) - आज ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्षांची एक संयुक्त बैठक घेण्यात आली. संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय अवलोकन करण्यात आले. अन् एकमताने महाविकास आघाडी व्हावी, अशीच इच्छा व्यक्त करण्यात आली. त्याचप्रमाणे यापुढे महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या विरोधात कोणीही बोलू नये, असे आमचे आपापसात ठरविण्यात आले आहे. समोरुन जरी कोणी बोलले तरी प्रत्युत्तर द्यायलाच हवे, असे काही नाही. 


          आपला प्रमुख प्रतिस्पर्धी हा भाजप आहे. भाजप या शहरात, जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात वाढू द्यायची नसेल तर महाविकास आघाडी आवश्यक आहे, असे सर्वच अध्यक्षांचे मत आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी गरजेची आहे. त्यासाठीच सर्व जिल्हाध्यक्षांनी महाविकास आघाडी करण्याबाबत आपले मत नोंदविले आहे,  अशी माहिती  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र यांनी सांगितले 


         महाविकास आघाडीचा निर्णय घेण्यासाठी ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी एक संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीला ठाणे शहर-जिल्हाध्यक्ष तथा ठाणे पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे, ठाणे ग्रामीणचे अध्यक्ष दशरथ तिवरे, कल्याण-डोंबिवलीचे अध्यक्ष जगन्नाथअप्पा शिंदे, कल्याण-डोंबिवलीचे कार्याध्यक्ष वंडारशेठ पाटील, नवी मुंबई अध्यक्ष अशोक गावडे, उल्हासनगर अध्यक्ष पंचम कलानी, मीरा-भाईंदर जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे, अंबरनाथचे अध्यक्ष सदामामा पाटील, बदलापूर अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर ना. डॉ. आव्हाड पत्रकारांशी बोलत होते. 


          ना. डॉ. आव्हाड म्हणाले की,  महाराष्ट्रात एकत्र येऊन राज्य पातळीवर एकमेकाला साह्य करीत भाजपच्या प्रवृत्तीविरुद्ध आपण लढत आहोत. जसे संजय राऊत यांच्या बाजूने सुप्रियाताई सुळे उभ्या राहिल्या आहेत किंवा शरद पवार हे जसे वारंवार सर्वच नेत्यांची बाजू लढवित आहेत. त्याचधर्तीवर राज्यभर पक्षविरहीत वातावरण संपूर्ण राज्यात निर्माण व्हायला हवे, अशी सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कारण, महानगर पालिका निवडणुकांनंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. कार्यकर्त्यांचे मनोमिलन फार गरजेचे आहे. त्यामुळेच सर्वांनी एकमताने महाविकास आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही महाविकास आघाडी सर्वांनाच फायद्याची ठरणार आहे. 


          शिवसेनेची चर्चा करणार का, याबाबत पत्रकारांनी विचारले असता,  आज आम्ही पक्षांतर्गत चर्चा केली आहे. निवडणुका कधी जाहीर होतील, याचा काही स्पष्ट अंदाज येत नाही. आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे. आमच्यातर्फे ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे हे चर्चा करणार आहेत. शिवाय, या चर्चेसाठी प्रत्येक जिल्हास्तरावर तीन ते चार जणांची समिती नेमून तेही या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. 


        गेल्या तीन ते चार दिवसांपासून पालकमंत्री एकनाथ शिंदे हे मुलाखती देत आहेत; त्याकडे पाहता, ते सकारात्मक भूमिका घेत असल्याचे दिसून आल्यानेच आम्ही पुढाकार घेऊन हा निर्णय घेतला असून त्यामुळे भाजपला पराभूत करणे शक्य होणार आहे.  महाविकास आघाडी होणे ही लोकभावना आहे. आपला वैचारिक शत्रू संपवायचा असेल तर काय करायला हवे, हेच आपण सांगत आहोत. 


          राष्ट्रवादीने जरी भूमिका घेतली असली तरी शिवसेनेचे काही पदाधिकारी विरोधी भूमिका घेत आहेत; त्यांना काय सल्ला देणार, असे विचारले असता,  मी त्यांचा नेता नाही; त्यांना एकनाथ शिंदे सल्ला देतील. मात्र, एकदा नेत्याने भूमिका घेतल्यावर पदाधिकार्‍यांनी बोलू नये, असे संकेत आहेत. त्यामुळेच या पुढे राष्ट्रवादीकडून आघाडीबाबत अन्य कोणीही बोलणार नाही, असे आपण जाहीर केले आहे. 


          तापलेले वातावरण निवळण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.  शिवाय, आघाडी असली की त्यामध्ये वाद असतातच; पण, एक-दुसर्‍याला सावरल्याशिवाय, एकवाक्यता आणल्याशिवाय तुम्ही उभेच राहू शकत नाही. 105 संख्या असलेल्या भाजपला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सत्तेबाहेर ठेवले; हा गणिती भाग आहे. याचा विचार करुनच काम केले पाहिजे. पालिका निवडणुकीत 100 ते 200 मतांचाही परिणाम होत असतो. ही मते पालिकेचे चित्र बदलवणारे ठरु शकतात. 

 

         ठामपाच्या प्रारुप आराखडयाबाबत डॉ. आव्हाड म्हणाले की, नागरिकांनी हरकती दाखल केलेल्या आहेत. आता निवडणूक आयोग ठरवेल काय करायचे ते!


           या आधी टीकाटीप्पण्या झाल्यानंतर महाविकास आघाडीचा नवा अध्याय सुरु होणार का, यावर डॉ. आव्हाड म्हणाले,  मला वाटते की 2019 च्या निवडणुकीत टीका झाली नाही का? पण, निवडून आल्यावर  वी आर 162 हा जो प्रकार झाला; हे दिसून आलेच ना? आघाडीमध्ये मतभेद असतात. पण, ते बाजूला सारुन कॉमन मिनिमम प्रोग्राम करुन पुढे जावेच लागते. अद्याप चर्चेला सुरुवात झालेली नाही. पण, आज ना उद्या ही चर्चा सुरु करावी लागेल. त्यासाठीच आमच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आम्ही जाणून घेतलेले आहे. मात्र, चर्चेला बसल्यावर अजेंडा ठरणार आहे.


सह्याद्रीनेच छातीचा कोट केलाय


        दिल्लीने महाराष्ट्रवर अन्याय केला आहे, या संजय राऊत यांच्या विधानावर ना. डॉ. आव्हाड यांनी, दिल्लीने महाराष्ट्रावर अन्याय केलेला आहे, ही गोष्ट खरी आहे. हेही तेवढेच खरे आहे की, सह्याद्री कधीच हिमालयापुढे झुकला नाही. पण, इतिहास बोलका आहे की जेव्हा-जेव्हा हिमालय अडचणीत आला. तेव्हा तेव्हा सह्याद्रीनेच छातीचा कोट केला आहे, असे सांगितले.  


■मेलो तरी चालेल; पण, झोपड्यांवर वरंवटा फिरु देणार नाही


        रेल्वे रुळांलगतच्या झोपडीधारकांच्या पुन:र्वसनाबाबत रेल्वे मंत्री वैष्णवी आणि रेल्वेराज्यमंत्री दानवे हे दोघेही सकारात्मक आहेत. पाचव्या-सहाव्या रेल्वेरुळांमुळे विकास होत आहे. पण, हा विकास साधत असताना तुम्ही गोरगरीबांच्या घरावर वरंवटा फिरवू शकत नाहीत. मी मेलो तरी चालेल; पण, असा वरंवटा फिरवू देणार नाही. जेव्हा उच्च न्यायालयाने कळव्यातील झोपड्या पाडण्याचे आदेश दिले. तेव्हा मी 25 हजार लोकांना घेऊन रेल्वे अडविली होती. 


          या झोपडीधारकांचे पुन:र्वसन करताना या गोरगरीबांना त्यांचे पोट महत्वाचे आहे. आता तुम्ही त्यांना वडाळा, भाईंदरपाड्याला घर देणार; ते बिचारे सर्व कुटुंब स्थानिक उद्योगाशी संबधित असते. आमच्या भगिनी शिवणकाम, घरकाम, भाजी विक्री करीत असतात. दुसर्‍या जागेवर जाऊन त्यांना काय काम मिळणार? शेवटी प्रश्न हा घर आणि पोट या दोघांचा आहे. तुम्ही घर दिलेत; पोटाचे काय, शिक्षणाचे काय? हे बोलणे फार सोपे आहे. 


          रेल्वेकडे अनेक ठिकाणी जागा आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश आहेत की, राज्य सरकारची झोपडपट्टी पुन:र्वसन योजना असेल तर केंद्र सरकारने त्यामध्ये सहभागी व्हावे; आणि रेल्वेच्या जागेवरील झोपडीधारकांना न्याय द्यावा. उल्हासनगर, कल्याण, बांद्रा, विक्रोळी येथेही हाच प्रकार आहे. लाखो लोकांना बेघर करायचे असेल तर जनरल डायरला यावे लागेल. जनरल डायर येवो काय किंवा कर्झन येवो काय, एकही झोपडी पाडू देणार नाही. आपण कालच रेल्वेमंत्र्यांना सांगितले आहे की, तुम्हाला गोळ्या चालवाव्या लागतील.


          महाराष्ट्र रक्तबंबाळ झाला तरी चालेल; पण, गरीबांसाठी महाराष्ट्र लढणार! रेल्वेमंत्र्यांना, आपण गृहनिर्माण मंत्री असून एसआरएसाठी कधी बैठक घ्यायची हे आपण रेल्वेमंत्र्यांना कालच विचारले आहे. राज्य सरकार या झोपडीधारकांच्या पुन:र्वसनाची सर्व जबाबदारी घ्यायला तयार आहे. फक्त रेल्वेने जमिनी उपलब्ध करुन द्याव्यात. पुन्हा त्यांनी बघू पण नव्हे; आम्ही सर्व अडचणी दूर करु, असा आशावाद ना. डॉ. आव्हाड यांनी रेल्वे रुळांलगतच्या झोपडीधारकांसाठी व्यक्त केला. 


■क्लस्टरच्या श्रेयापेक्षा काम होते हे महत्वाचे


          क्लस्टरचे श्रेय भाजपचे असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. त्याबाबत विचारले असता, क्लस्टरचे धोरण हे पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केले आहे. त्यामध्ये थोडाफार फेरफार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे त्याचे श्रेय घ्यायचेच झाले तर ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आघाडी सरकार होते. त्यामुळे श्रेय आघाडी सरकारचे आहे. क्लस्टरसाठी मोर्चा-उपोषण आदी आंदोलने आपण केली होती. त्यामुळे श्रेयवादाचा प्रश्न नाही. लोकांची कामे होतात; हे महत्वाचे नाही का? असा सवालही डॉ. आव्हाड यांनी उपस्थित केला. संस्कारक्षम महाराष्ट्राचे राजकारण घरगंळत आहे


         संस्कारक्षम असलेले महाराष्ट्राचे राजकारण हे सह्याद्रीच्या कड्यावरु घरंगळत खाली  येताना दिसत आहे. विरोधी पक्षातील नेता आजारी असेल तर त्यांनाा हेलिकॉप्टरमधून रुग्णालयात नेलेले आहे. अनेक आजारी नेत्यांना अमेरिकेला नेऊन उपचार करुन आणलेले आहे. कधीही कोणीही कोणाच्या घरापर्यंत पोहचलेले नाही. कोणाच्या पोराबाळांना त्रास होईल, असे कोणीही वागलेले नाही. या महाराष्ट्रावर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत. 


        आपल्या मुलाबाळांचा राजकारणाशी काही सबंध नसतो. पण, घराला त्रास देण्याचा जो प्रकार गेल्या 5 -6 वर्षांपासून सुरु आहे. ते चांगले नाही. सामान्य माणसाला या प्रकाराशी घेणेदेणे नाही. त्यांना मूलभूत गरजांची पूर्तता होणे अधिक महत्वाचे वाटते. हे सर्व करताना चीनच्या घुसखोरीकडे दुर्लक्ष करुन भावनिक खेळ खेळले जात आहेत. सांताक्लॉजचा पुतळा जाळल्यामुळे व्हॅटीकन सिटीने नाराजी व्यक्त केली आहे. आपण आता एकमेकांचा द्वेष करीत आहोत. हे द्वेषाचे राजकारण देशाला पुढे कधीच नेणार नाही, असेही ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments